तहसील कार्यालयात आता ई-आॅफीस प्रणाली
By Admin | Updated: January 6, 2015 22:53 IST2015-01-06T22:53:31+5:302015-01-06T22:53:31+5:30
तहसील ते जिल्हाधिकारी व थेट विभागीय आयुक्त कार्यालय असा संपूर्ण विभाग ई-आॅफिस प्रणालीच्या सहाय्याने पेपर लेस करण्यासाठी महसूल विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे

तहसील कार्यालयात आता ई-आॅफीस प्रणाली
मोहन राऊ त - अमरावती
तहसील ते जिल्हाधिकारी व थेट विभागीय आयुक्त कार्यालय असा संपूर्ण विभाग ई-आॅफिस प्रणालीच्या सहाय्याने पेपर लेस करण्यासाठी महसूल विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता प्रत्येक तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या टेबलवर संगणक राहणार आहे़ याद्वारे कामकाजात सुसूत्रता येणार आहे़
प्रशासकीय कामकाजात एखाद्या पत्राला उत्तर देण्यापूर्वी ४० ते ४५ विविध स्तरातून व डझनभर नोंदवह्यांतून हे पत्र प्रवास करते़ या कागदाच्या साधारणत: १० ते १५ प्रती काढली जातात़ एकाच पत्राची प्रत विविध विभागातील कपाटात जमा ठेवण्यात येते़ कोणत्याही प्रकारची कागदपत्रे शोधण्यासाठी २० मिनिटे लागतात़ काही कागदपत्रे कधीच मिळत नाहीत़ अनेक वेळा ही कागदपत्रे गहाळ होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळते़ त्यामुळे महसूल विभागाने ई-आॅफिस सेवा सुरू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता़ आता ही प्रणाली अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात राबविण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहे़ अमरावती जिल्ह्यात १४ तहसील कार्यालये आहेत़
यवतमाळ १६, वाशीम ६, बुलढाणा १४, अकोला ६ असे या जिल्ह्यात तालुके आहेत़ ई-आॅफिस हा वेब बेस असलेल्या विविध संगणक प्रणालीचा संच आहे़ कार्यालयात प्राप्त टपालापासून निर्गमित होणाऱ्या पत्राचा प्रवास ई-आॅफिसमध्ये डिजिटल होणार आहे़ त्याचबरोबर स्थायी आदेश संचिता, सेवा पुस्तिका, रजा, कार्यालयीन सभा, नियोजन असे विविध सात प्रक्रियांचे संच ई-आॅफिस या एकाच वेब अॅप्लिकेशनमध्ये सामावलेले आहेत़
ई-आॅफिसमुळे कागदपत्रविरहीत कार्यालयांचे कामकाज चालून यामध्ये पारदर्शकता व गतिमानता येणार आहे़ या प्रणालीमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या टेबलावरील फाईलचे गठ्ठे नाहिसे होऊन कार्यालयात स्वच्छता व नीटनिटकेपणा दिसणार आहे़ ही ई-अॉफिस प्रणाली ५६ तालुके व पाच जिल्ह्यांत राबवून थेट विभागीय आयुक्त कार्यालयाशी जोडली जाणार आहेत़