शहरातील १९ टक्के पाण्यात ई-कोलाय जिवाणू
By Admin | Updated: August 18, 2015 00:12 IST2015-08-18T00:12:55+5:302015-08-18T00:12:55+5:30
शासकीय आरोग्य प्रयोगशाळेने जुलै महिन्यात केलेल्या पाणी नमुन्यांच्या अनुजीव तपासणीत १९ टक्के पाण्यात ई-कोलाय जिवाणू आढळून आले आहेत.

शहरातील १९ टक्के पाण्यात ई-कोलाय जिवाणू
आरोग्याला धोका : शासकीय प्रयोगशाळेचा जुलै महिन्याचा अहवाल
अमरावती : शासकीय आरोग्य प्रयोगशाळेने जुलै महिन्यात केलेल्या पाणी नमुन्यांच्या अनुजीव तपासणीत १९ टक्के पाण्यात ई-कोलाय जिवाणू आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेने दिला आहे. परिणामी दूषित पाण्याने लाखो अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
पावसाळा सुरु झाल्यावर जलपातळी वाढताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देखील गढूळ पाण्याचा पुरवठा सुरु होतो. शहरातील जलस्त्रोतांच्या पातळीत वाढ झाल्याने पाणी ढवळून निघते. यामुळे नाले, विहिरी व हॅन्डपंपमधूनही दूषित पाणीपुरवठा होतो. शासकीय प्रयोगशाळेने जुलै महिन्यात अमरावती शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील एकूण १ हजार ८४२ पाणी नमुन्यांची अनुजीव तपासणी केली. त्यामध्ये ग्रामीण भागातील ९६८ पाणी नमुन्यांपैकी २२४ नमुने दूषित आढळून आले. शहरी भागातील ८७४ पाणी नमुन्यांची तपासणी केली असता त्यामध्ये १२३ नमुने दूषित आढळून आले आहेत.