ई-टेंडर प्रक्रियेमुळे खोळंबली ग्रामपंचायतींमधील कामे
By Admin | Updated: December 27, 2014 22:44 IST2014-12-27T22:44:06+5:302014-12-27T22:44:06+5:30
शासनातर्फे पाच लक्ष रूपयांवरील विकासकामाच्या निविदा ई-टेंडर पद्धतीने’ करावयाची प्रणाली, जिल्हा परिषद अंतर्गत बंद असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विकासकाला बसला आहे.

ई-टेंडर प्रक्रियेमुळे खोळंबली ग्रामपंचायतींमधील कामे
अचलपूर : शासनातर्फे पाच लक्ष रूपयांवरील विकासकामाच्या निविदा ई-टेंडर पद्धतीने’ करावयाची प्रणाली, जिल्हा परिषद अंतर्गत बंद असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विकासकाला बसला आहे. सदर कामे वन टेंडर पद्धतीने करण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केली आहे.
राज्य शासनातर्फे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणारी ‘ई टेंडर’ प्रणाली जिल्हा परिषदेतर्फे दीड महिन्यांपासून बंद आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये येणारा कोट्यवधी रूपयांचा निधी व विकास कामे थांबली आहे. पाच लक्ष रूपयांवरील निधीतील विकास कामे पूर्णत: बंद आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने आचारसंहिता लागणार आहे. परिणामी शासनातर्फे ग्रामपंचायत विकासासाठी पाठविण्यात आलेला निधी मार्च महिन्यापूर्वी खर्च न झाल्यास परत जाण्याची भीती वर्तविली जात आहे.
एकंदर राज्य शासनाने ई-निविदा पद्धत’ मागील दीड महिन्यांपासून बंद असताना कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती मात्र नेण्यात आली. एकीकडे ई-निविदा पद्धत बंद करून विकास निधी परत नेण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)