‘वर्ल्डक्लास’ इमारतीच्या नावावर धूळफेक
By Admin | Updated: August 8, 2016 23:56 IST2016-08-08T23:56:11+5:302016-08-08T23:56:11+5:30
स्थानिक कॅम्प रोडवरील डागा सफायर या निर्माणाधीन इमारतीच्या कर्त्याधर्त्यांनी ग्राहकांची फसवणूक चालविली आहे.

‘वर्ल्डक्लास’ इमारतीच्या नावावर धूळफेक
‘डागा सफायर’ अनधिकृतच : ग्राहकांमध्ये कमालीची धास्ती
अमरावती : स्थानिक कॅम्प रोडवरील डागा सफायर या निर्माणाधीन इमारतीच्या कर्त्याधर्त्यांनी ग्राहकांची फसवणूक चालविली आहे. तत्कालीन आयुक्तांनी आपल्याला आठ मजली इमारत उभारण्यास मंजुरी दिल्याचा दावा डागा सफायरकडून करण्यात येत असला तरी त्यांनी वर्ल्डक्लास इमारतीच्या नावावर धूळफेक चालविल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
अंबानगरीवासियांसाठी आपण वर्ल्डक्लास इमारती उभारत असल्याचा दावा डागा सफायरकडून वारंवार करण्यात येतो. या आठ मजली इमारतींमध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन ग्राहकांना इतरांपेक्षा अधिक सुविधायुक्त फ्लॅट देण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. मात्र, हायराईज बिल्डिंग बांधण्याचा दावा करणाऱ्या डागा सफायरची पायाभरणीच खोट्यावर आधारित असेल तर उर्वरित सारेच अनधिकृत आणि अवैध ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांमधून उमटली आहे.
लाखो रूपये खर्च करुन डागा सफायरमध्ये फ्लॅट बुक करणाऱ्यांमध्येही अवैध बांधकामामुळे खळबळ उडाली आहे. या तीनही टोलेजंग इमारती अवैध असतील तर फ्लॅटची मालकी घेतल्यानंतरही महापालिका वा कोर्टबाजीला सामोरे जावे लागेल, या भीतीने अनेकांची पाचावर धारण बसली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ अंतर्गत बांधकाम परवानगीचा अर्ज नकाशासह रितसर आॅटो डीसीआर प्रणालीअंतर्गत या कार्यालयात दाखल करावा.
नोटीस बजावली
अमरावती : तत्पूर्वी १० लाखांची अनामत रक्कम २ दिवसांत भरावी, अशी नोटीस १९ मे रोजी सहायक संचालक नगररचना विभागाकडून डागा इन्फ्राटेक प्रा.लि.च्या ध्रुव डागा यांना पाठविली. यानुसार डागा सफायरला बांधकाम परवानगीचा अर्ज नकाशासह आॅटो डीसीआर प्रणालीअंतर्गत दाखल करावयाचा होता. मात्र,त्यांनी तसा अर्ज एडीटीपीकडे दाखल केला नाही. त्यामुळे डागा सफायरच्या ए,बी आणि सी या तीन इमारतींमधील ३४९६.३२ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत आणि अवैध ठरविण्यात आले. याप्रकरणी राजेश डागा यांना महापालिकेकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. डागा यांना १५ दिवसांमध्ये बाजू मांडायची असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.ए,बी आणि सी या तीन इमारतींमध्ये डागा यांनी तब्बल ३४९६.३२ चौरसमीटर अनधिकृत बांधकाम केले आहे. (प्रतिनिधी)