वर्षभरातच डांबरी रस्त्याची झाली माती
By Admin | Updated: December 30, 2016 00:49 IST2016-12-30T00:49:03+5:302016-12-30T00:49:03+5:30
सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून साकारण्यात आलेले वडाळी येथील बांबूवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

वर्षभरातच डांबरी रस्त्याची झाली माती
वडाळी बांबूवनातील प्रकार : रस्त्यावर चुरी, डांबरीकरण उखडले
अमरावती : सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून साकारण्यात आलेले वडाळी येथील बांबूवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना गतवर्षी निर्माण करण्यात आलेल्या डांबरीकरण केलेल्या रस्त्याची माती झाली आहे. यागंभीर प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार नोंदविण्यात आली असतानाही याकडे वनाधिकारी दुर्लक्ष करून संपूर्ण प्रकरण गुंडाळण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे.
बांबू वनउद्यान हे अमरावतीच्या वैभवात भर घालणारे आहे. नव्या वर्षात १ जानेवारी २०१७ रोजी या उद्यानाचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे. बांबू वनउद्यानाचीकाही किरकोळ कामे झाली नसली तरी ते युद्धस्तरावर करण्यासाठी वनाविभाग अहोरात्र प्रयत्न करीत आहे.
नक्षत्र, पगोडा बांधकामातही मुरुमाचा वापर
बांबूवनातील रस्त्यांची पुरती वाट लागली असताना नक्षत्र, पगोडा बांधकामातही गिट्टीऐवजी मुरुम वापरल्याची तक्रार करण्यात आली आहे. ८० एमएम आकारची गिट्टी न वापरता मुरुम वापरुन बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामाची खोलात जाऊन तपासणी केल्यास बरेच तथ्य बाहेर येईल, यात दुमत नाही.
तक्रारीनंतरही चौकशी का नाही ?
वडाळी येथील बांबूवनातील रस्ते निर्मितीत गिट्टीऐवजी मुरुम वापरल्याची तक्रार वलय पिसे नामक व्यक्तीने केली आहे. रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पाहणीअंती दिसून येते. गंभीर स्वरुपाची तक्रार दिली असताना अद्याप वरिष्ठांनी याप्रकरणाची चौकशी करु नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वडाळी बांबू वनोद्यानात रस्ते निर्मितीत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली असून अहवालानंतर कारवाईची दिशा ठरविली जाईल.
- हेमंत मीना,
उपवनसंरक्षक, अमरावती