‘डुप्लिकेट’ कन्हान रेतीच्या कारखान्यावर धाड

By Admin | Updated: June 26, 2016 23:58 IST2016-06-26T23:58:09+5:302016-06-26T23:58:09+5:30

बडनेरामध्ये डुप्लिकेट कन्हान रेती तयार करून बिनबोभाट विक्री सुरू असल्याचे सप्रमाण वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभागाचे धाबे दणाणले.

'Duplicate' khanan sand factory forage | ‘डुप्लिकेट’ कन्हान रेतीच्या कारखान्यावर धाड

‘डुप्लिकेट’ कन्हान रेतीच्या कारखान्यावर धाड

श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
बडनेरामध्ये डुप्लिकेट कन्हान रेती तयार करून बिनबोभाट विक्री सुरू असल्याचे सप्रमाण वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभागाचे धाबे दणाणले. 'लोकमत'च्या दणक्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने रविवारी म्हणजे सुटीच्या दिवशीदेखील या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान २० ब्रास रेती जप्त करण्यात आली. आता याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
विटांच्या कारखान्यातील वेस्टेज मटेरिअल जसे विटांचा चुरा व नाल्यातील रेती मिसळून कन्हानची डुप्लिकेट रेती तयार करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून बडनेरा शहरात सुरू होता. 'लोकमत'ने याबाबतचा वृत्तांत सलग दोन दिवस सप्रमाण प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागामध्ये खळबळ उडाली.

महसूल विभागाची भूमिका संशयास्पद
बडनेरा : १० किलोमीटर परिसरातील नाल्यांमधून निकृष्ट दर्जाची रेती आणून त्यात विटांचा चुरा, कारखान्यातील वेस्ट आणि दगड याचे यंत्राद्वारे मिश्रण करून डुप्लिकेट कन्हान रेती तयार केली जात होती. या रेतीमुळे अनेक ग्राहकांची तर फसवणूक होतच होती, शिवाय या रेतीचा वापर करून केल्या जाणाऱ्या बांधकामाचा दर्जाही ढासळत होता. त्यामुळे शासकीय जमिनीवर सुरू असलेला हा प्रकार बंद करून यात गुंतलेल्या लोकांवर कारवाई करण्यात यावी, असे वृत्त ‘लोकमत’ने लावून धरले होते.
याप्रकरणी असलेली महसूल विभागाची संशयास्पद भूमिका देखील लोकमतने लोकांसमोर मांडल्याने अखेर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला.
कारवाई दरम्यान २० ब्रास रेती महसूल विभागाने जप्त केली. तसेच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे लेखी पत्र बडनेरा पोलिसांना देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महसूल विभागाच्या पथकात नायब तहसीलदार धीरज मांजरे, मंडल अधिकारी शंकर गोरडे, तलाठी भगत, अजय पारेकर यांचा सहभाग होता.

‘महसूल’मध्ये खळबळ : २० ब्रास रेती जप्त, फौजदारीच्या हालचाली
‘लोकमत’चा दणका, रविवारी कारवाई
बडनेरात डुप्लिकेट कन्हान रेती तयार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली. या वृत्ताने पायाखालची जमीन सरकलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सुटीच्या दिवशी त्या अवैध कारखान्यावर धाड टाकली. तहसीलदार सुरेश बगळे यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली. ‘लोकमत’मुळे अनेकांची फसवणूक टळली आहे, हे विशेष.

जप्त रेतीच्या सुरक्षेसाठी ‘महसूल’ कर्मचारी तैनात
डुप्लिकेट कन्हान रेती तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर जप्त केलेल्या रेतीच्या सुरक्षेसाठी महसूल विभागाचा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. या रेतीचा लिलाव केला जाईल, असे नायब तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले.

रेतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित इसमावर फौजदारी कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना देऊ. जप्त रेतीचा लिलाव करण्यात येईल. शासकीय भूखंडाचा असा वापर खपवून घेतला जाणार नाही.
- सुरेश बगळे,
तहसीलदार, अमरावती

Web Title: 'Duplicate' khanan sand factory forage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.