चुकीच्या नियोजनामुळे नाल्यावरील स्लॅबचा खर्च व्यर्थ
By Admin | Updated: August 14, 2016 23:59 IST2016-08-14T23:59:56+5:302016-08-14T23:59:56+5:30
महापालिकेने अंबा नाल्यावर तीर्थक्षेत्र आराखड्यासंदर्भात टाकलेला स्लॅब व इतर कामाचे १ कोटी ८८ लक्ष रुपये व्यर्थ गेले.

चुकीच्या नियोजनामुळे नाल्यावरील स्लॅबचा खर्च व्यर्थ
एक कोटी ८८ लाखांचा चुना : मार्ग बदलविण्याच्या हालचाली
अमरावती : महापालिकेने अंबा नाल्यावर तीर्थक्षेत्र आराखड्यासंदर्भात टाकलेला स्लॅब व इतर कामाचे १ कोटी ८८ लक्ष रुपये व्यर्थ गेले. महापालिकेच्या तत्कालीन शहर अभियंताच्या चुकीच्या नियोजनामुळे स्लॅबच्या बांधकामाचा खर्च व्यर्थ गेल्याचे बोलल्या जात आहे.
येथील अंबादेवी- एकवीरादेवी संस्थेचा तीर्थक्षेत्र आराखड्यांतर्गत रविनगरकडे जाणाऱ्या पुलापासून मंदिरापर्यंत अंबानाल्यावर स्लॅब टाकला. नमुन्याकडे असलेल्या बाजूला नाल्यावर अर्धवटच स्लॅब टाकला असुन काही पोल नाल्यात उघडे पडले आहेत. त्यामुळे येथील रिटेलिंग वॉललाही धोका निर्माण झाला आहे. भविष्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करुन लोकदरबारात मांडले होते. गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता. मागील वर्षी तत्कालीन शहर अभियंत्यांच्या कार्यकाळात विकास आराखड्याचे काम करण्यात आले याकरिता १५ टक्के निधी अंबा-एकविरा मंदिर संस्थानचा १५ टक्के महापालिकेचा १० टक्के लोक सहभाग व ६० टक्के निधी केंद्र शासनाचा असे २ कोटी ७३ लक्ष रुपये निधींचा सदर तीर्थक्षेत्र विकास आरखड्याचे अर्धवट काम करण्यात आले आहे. या कामाांवर आतापर्यंत १ कोटी ८८ लक्ष रुपये खर्च झाल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. पुलापासून तर मंदिरापर्यंत स्लॅबचे काम करण्यात आले आहे. व उजव्या बाजूला पुलापासून तर नमुना गल्लीकडे अंबानाल्यावर स्लॅब टाकुन त्यावर या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था स्लॅबवरच करण्याची महापालीकेने तयार केलेल्या आराखडा नकाशात होती. या स्लॅबपासून सोल्ब काढून पुलावर वाहन उतरविली तर येथे या वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते, असे महापालिकेच्या अधिकारी व पदअधिकाऱ्यांच्या उशिरा निदर्शनास आले. त्यामुळे या पुलावर अधिक निधी खर्च होणार होता ते कामांवर खर्च व्यर्थ जाऊ नये म्हणून महापालिकेने हे काम थांबविले. त्यामुळे नाल्यात उभारलेले पोल तसेच ठेवण्यात आले. डाव्या बाजूला जो नाल्यावर काँक्रीटीकरणाचा स्लॅब टाकलेल्या बांधकामावर करण्यात आलेला खर्च व्यर्थ गेला. कर रुपात जनतेकडून महापालिकेला मिळालेल्या या पैशाला चुना लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या बांधकामात ज्या अधिकाऱ्यांनी या आराखड्याचे चुकीचे नियोजन केले व महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घालविला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेचा सावरागोंधळ
या पुलापासून नमुना गल्लीकडे बांधलेल्या स्लॅबचा काहीही उपयोग नाही. महापाकिलकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रिटेलिंग वॉलच्या बाजूला जुन्या महादेवाच्या मंदिराजवळील खासगी जागा महापालिकेच्या नगररचना विभागाने संपादित करावी. या मार्गावरुन त्या स्लॅबपर्यंत २० फुटांचा मार्ग काढल्यास या स्लॅबवर वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था केल्यास हा स्लॅब वाहतुकीच्या कामात येईल, असा जवाईशोध महापालिकेच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी लावला. तसा प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे.
पुलापर्यंत स्लॅब टाकून येथे पार्किंगची व्यवस्था करण्याचा मानस होता परंतु पुलावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून सदर काम थाबविण्यात आले. मागील मार्गावरून वाहतूक वळवून स्लॅबवर पार्किंगचा प्रस्ताव आहे.
- जीवन सदार,
शहर अभियंता, महापालिका