पोलिसांच्या साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव
By Admin | Updated: December 3, 2014 22:42 IST2014-12-03T22:42:26+5:302014-12-03T22:42:26+5:30
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोईसुविधांसोबतच साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना सोई-सुविधांबाबत ‘मॅकेन्झी’ आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही कागदोपत्रीच आहेत.

पोलिसांच्या साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव
चांदूरबाजार : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोईसुविधांसोबतच साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना सोई-सुविधांबाबत ‘मॅकेन्झी’ आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही कागदोपत्रीच आहेत.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुठल्या सोईसुविधा द्याव्यात, यासाठी ब्रिटिश राजवटीत ‘मॅकेन्झी’ आयोग नेमण्यात आला. लॉर्ड मॅकेन्झी अध्यक्ष असलेल्या या आयोगाने पोलिसांचे कर्तव्यकाळ, सेवा, मानसिक स्थिती, कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजा आदी बाबींचा अभ्यास केला. कर्तव्य बजावताना पोलिसांना अडचण येऊ नये, वाढीव कामाचा योग्य मोबदला मिळावा, त्यांची मानसिक स्थिती चांगली रहावी आदी शिफारशी मॅकेन्झी आयोगाने आपल्या अहवालात सुचविल्या होत्या.
पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबात वेळ देता येईल, पर्यायाने पोलिसांचे कौटुंबिक वातावरण चांगले राहून मानसिक समाधानही लाभेल. यासाठी साप्ताहिक रजा देण्यात यावी, अशीही शिफारस या अहवालात करण्यात आली. ही शिफारस राज्याच्या गृहखात्याने स्वीकारली. आयोगाच्या शिफारसीनुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजा अग्रक्रमाने द्यावी, कुठल्याही परिस्थितीत ही सुटी रद्द करू नये, असे गृहखात्याचे आदेश आहेत. मात्र, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सावधगिरी म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर ठेवले जाते. अचानक त्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. गेल्या वर्षी तर दिवाळीसारख्या सणाच्या कालावधीतही पोलिसांच्या साप्ताहिक रजा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, साप्ताहिक रजेच्या दिवशी कामावर आल्यास बदली रजा मिळत नाही. केवळ मोबदला दिला जातो. (तालुका प्रतिनिधी)