'जलपर्णी'मुळे पिंगळा झाली गटारगंगा

By Admin | Updated: March 1, 2015 00:21 IST2015-03-01T00:21:06+5:302015-03-01T00:21:06+5:30

प्रवाहित नसणारे पाणी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी यामुळे तिवसा तालुक्यातील पिंगळा नदीसह लहान-मोठे नदीनाले प्रदूषित झाले आहेत.

Due to 'waterfalls', Pingala has become pigal | 'जलपर्णी'मुळे पिंगळा झाली गटारगंगा

'जलपर्णी'मुळे पिंगळा झाली गटारगंगा

गजानन मोहोड तिवसा
प्रवाहित नसणारे पाणी व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पाणी यामुळे तिवसा तालुक्यातील पिंगळा नदीसह लहान-मोठे नदीनाले प्रदूषित झाले आहेत. नदिपात्रात कचरा टाकण्यात येत असल्यामुळे पाण्यात घाण व जलपर्णी वनस्पती वाढल्याने नद्या मानवी आरोग्यासाठी धोकादायक बनल्या आहेत.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी कमी आहे. तसेच नदी नाल्यावर बहुतेक गावात बांध घालण्यात आल्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांचे पाणी प्रवाहित नाही. कृषी विभागाद्वारा दगडी बंधारे बांधण्यात आल्याने नदी-नाल्यांचा प्रवाह खोळंबला आहे. पाणी प्रवाहित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. तालुक्यातील पिंगळानदी प्रदूषित झाल्यामुळे तिवसेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील सांडपाणी नालीद्वारे नदीत सोडण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. नदीपात्र अरुंद झाल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. गावातील कचरादेखील नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने नद्यांचे गटार बनले आहेत. सद्यस्थितीत तिवसा, डेहणी, शेंदूरजना बाजार, मोझरी, तळेगाव ठाकूर येथील नदीनाले गटारगंगा बनले आहे.
सांडपाण्यावर भाजी पिके
नदीच्या पाण्यात गावातील सांडपाणी नालीद्वारे नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. मानवी आरोग्यास हे पाणी धोकादायक आहे. मात्र या पाण्याच्या सिंचनातून काही शेतात भाजीपाला पिकविण्यात येतो, तो आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे.
दलदल वाढली
नदी-नाल्यांच्या पात्रातील पाणी कमी झाले. त्यामुळे या ठिकाणी जलापर्णी व दलदल वाढली आहे. पात्रात बेशरमसह झाडांची दाटी झाली, डुकरांची वर्दळ व डासांची उत्पत्ती हे नदीकाठच्या वस्तीसाठी धोकादायक बनले आहे.
दूषित पाण्यामुळे त्वचाविकार
दूषित नदिनाल्याचे पाणी शरीरास व वापरास घातक आहे. अनेक घातक जीवजंतूंची निर्मिती या पाण्यातून होते. या पाण्यात पाय बुडविल्यास खाजेची लागण होते. शरीरावर पूरळ येतात. या पाण्यात कपडे धुणे अपायकारक आहे. तसेच पशुंनाही या पाण्यामुळे पोटाचे विकार होतात.
नदीपात्रात टाकला जातो कचरा
तालुक्यातील नदी-नाल्याचे पात्र अरुंद झाले आहे. यंदा पावसाळा कमी झाल्याने नदीपात्रात डबकी साचली आहेत. या पात्रात गावकरी कचरा टाकतात. त्यामुळे कचऱ्याचे ढीग नदीपात्रात पाहावयास मिळतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
अतिक्रमणामुळे
नद्यांचा गुदमरतो जीव
नदी-नाल्यांना पाणी नसल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. गाळ उपस्यामुळे पडलेले खड्डे, कचरा व नदीकाठी वाढते अतिक्रमण यामुळे नद्यांचा श्वास गुदमरत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
तिवसा येथील पिंगळा नदीवर उगमापासून ५ ठिकाणी बंधारे बांधण्यात आल्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात घाण तयार होते. नदीपात्राची सफाई करण्यात यावी यासाठी बीडीओंना वारंवार निवेदन दिले आहे.
- धर्मराज थूल,
सरपंच, ग्रामपंचायत तिवसा

Web Title: Due to 'waterfalls', Pingala has become pigal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.