हरमच्या वेदांतमुळे मिळाले तिघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:57+5:30
हरम येथील दुष्यंतसिंह बद्रटिये आणि अंजली या दाम्पत्याचा दहावीत शिकणारा मुलगा वेदांत हा शिकवणीकरिता २७ नोव्हेंबरला अचलपूरला सायकलने गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास त्याला गावापासून अर्धा किलोमीटर अपघात झाला. त्याला प्रथम परतवाडा व नंतर अमरावती येथे खासगी रुग्णालयात तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तो ब्रेनडेड अवस्थेला गेला.

हरमच्या वेदांतमुळे मिळाले तिघांना जीवनदान
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील हरम येथील वेदांतमुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. वेदांत ब्रेनडेड अवस्थेत गेल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी २ डिसेंबर रोजी आपल्या एकुलता एक मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय समाजाला प्रेरक ठरला आहे.
हरम येथील दुष्यंतसिंह बद्रटिये आणि अंजली या दाम्पत्याचा दहावीत शिकणारा मुलगा वेदांत हा शिकवणीकरिता २७ नोव्हेंबरला अचलपूरला सायकलने गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास त्याला गावापासून अर्धा किलोमीटर अपघात झाला. त्याला प्रथम परतवाडा व नंतर अमरावती येथे खासगी रुग्णालयात तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तो ब्रेनडेड अवस्थेला गेला. तेथून त्याला नागपूर येथे दाखल केले. ३० नोव्हेंबरला वेदांतला ब्रेनडेड स्थितीत परतवाडा येथील डॉ. आशिष भंसाली यांच्या दवाखान्यात आणले गेले. १ नोव्हेंबरला वेदांतच्या स्थितीबाबत आई अंजली यांना माहिती देण्यात आली आणि त्याच शोकमग्न अवस्थेत किशोर बद्रटिये, सचिन बद्रटिये, कैलास बद्रटिये, राजू खोजरे, मंगेश भोरे यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. डॉ. आशिष भंसालींसह पुनर्जीवन फाऊंडेशनचे डॉ. राजेश उभाड, डॉ. हर्षराज डफडे, जितेंद्र रोडे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत २ डिसेंबरला अवयवदानाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली.
वेदांतची किडनी, यकृत नागपूरला पाठविण्यात आले. डोळे अमरावतीला हरिना फाऊंडेशन अंतर्गत आय बँकच्या सुपूर्द करण्यात आले. दिल्ली येथील डॉ. अजिताभ श्रीवास्तव आणि नागपूर येथील डॉ. प्रकाश जैन यांच्यासह त्यांच्या चमूने तब्बल दीड तास शस्त्रक्रिया केली. यानंतर ‘ग्रीन कॅरिडोर’ करून अवयव नागपूरला रवाना करण्यात आले.
ग्रामीण भागातील पहिली व्यवस्था
ग्रामीण भागात किंवा लहान शहरांपैकी परतवाडा येथे असलेली ही व्यवस्था राज्यात पहिली आणि एकमेव असल्याची माहिती डॉ. हर्षराज डफडे यांनी ‘लोकमत’ला दिली. अचलपूर तालुक्यातील ३०० जणांनी मागील दीड वर्षांत अवयवदानाचा संकल्प केला असल्याचे पुनर्जीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड यांनी दिली.