मुसळधार पावसाने ‘इर्विन’चा अपघात कक्ष झाला जलमय
By उज्वल भालेकर | Updated: July 9, 2024 19:01 IST2024-07-09T19:01:01+5:302024-07-09T19:01:29+5:30
Amravati : शासकीय रुग्णालयांच्या इमारतीलाही गळती

Due to heavy rain, the accident room of 'Irwin' was flooded
अमरावती : सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला चांगलेच झोडपून काढले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील रस्त्यावरील पूर्ण पाणी रुग्णालयात शिरल्याने रुग्णालयातील अपघात कक्ष पूर्णपणे जलमय झाला होता. तसेच ही इमारत जुनी असल्याने अनेक वॉर्डामध्ये देखील गळती लागली होती. असेच काहीचे चित्र हे जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीनमध्येही पहायला मिळाले येथील काही वॉर्डात गळती सुरु होती.
शहरात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारात सर्वत्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. या मुसळधार पावसामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) प्रशासनाला फटका बसला आहे. शहरात सर्वत्र सिमेंट कॉँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर इर्विन रुग्णालय परिसरासमोरील रस्त्याचा उतार हा रुग्णालयाच्या दिशेने असल्याने दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळते.
पाण्यामुळे उडणारी ही तारांबळ दुर करण्यासाठी बांधकाम विभागाने रुग्णालयाचे प्रवेशद्वारांची उंची वाढवली. त्यामुळे पुन्हा बाहेरील रस्त्यावरचे पावसाचे पाणी हे रुग्णालय परिसरात येणार नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु मध्यरात्रीच्या पावसाने पुन्हा एकदा रुग्णालयातील अपघात कक्ष हे जलमय झाले होते. यावेळी अपघात कक्षामध्ये इमर्जन्सी रुग्णांवर उपचार सुरु होते. तसेच याठिकाणी डॉक्टर तसेच परिचारिका देखील होत्या. अशा या पाण्यामध्ये ते रुग्णांना सेवा देत होते. तर पावसाच्या पाण्याबरोबरच रस्त्यावरील घाण, कचराही रुग्णालयात आल्याने ते स्वच्छता करण्यासाठी मोठी कसरत रुग्णालय प्रशासनाला करावी लागली. त्याबरोबरच इर्विन आणि डफरीन रुग्णालयाच्या इमारती जुन्या असल्याने अनेक वार्डात पाणी गळतीची समस्याचा देखील रुग्णांना सामना करावा लागला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य उपाययोजना राबविण्याच्या सुचना केल्या आहेत.