स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प ठरणार दिवास्वप्न!
By Admin | Updated: July 23, 2016 23:59 IST2016-07-23T23:59:11+5:302016-07-23T23:59:11+5:30
महापालिकेचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प दिवास्वप्नच ठरणार असल्याची दुश्चिन्हे आहेत.

स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प ठरणार दिवास्वप्न!
निधीचा अडसर : डीपीआर फुगला
अमरावती : महापालिकेचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प दिवास्वप्नच ठरणार असल्याची दुश्चिन्हे आहेत. तब्बल ३७५ कोटी रुपयांचा डीपीआर बनविल्यानंतर हा प्रस्ताव मजीप्राकडे तांत्रिक मान्यतेकरिता पाठविण्यात आला. मात्र त्यानंतरही निधीचा अडसर असल्याने प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडणार आहे.
शहरातून वाहणाऱ्या ३० लहानमोठ्या नाल्यांपैकी ज्या ठिकाणी वस्ती आहे तेथे स्टॉर्म वॉटर नाले बांधकाम प्रस्तावित आहे. याशिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयोग स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीममध्ये अपेक्षित आहे. नाल्यांमधून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उपयोगात आणण्याच्या दिशेने पाच वर्षांपूर्वी यंत्रणेने पुढाकार घेतला. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. नाल्यांचे बांधकाम करून ते पाणी अडवायचे, जमिनीत मुरवायचे, प्रक्रिया करून जवळच्या बगिच्यांसह अन्य ठिकाणी वापरता येईल का? याबाबत हे प्रकल्पास उहापोह करण्यात आला आहे. ३७५.६७ कोटींचा हा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेनंतर अमृत योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न यंत्रणेला करावा लागणार आहे. अमरावती महानगरपालिका स्व उत्पन्नावर हा प्रकल्प उभारू शकत नाही आणि यंदाचा अमृतचा निधी शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झाला. यासाठी आर्थिक वर्षात तरतूद करता येणे शक्य नाही. पुढच्या वर्षीही प्रचंड फुगलेल्या डीपीआरचा ‘अमृत’मध्ये समावेश होईल, याबाबत खुद्द प्रशासनच साशंक आहे.
प्राथमिक सर्वेक्षणासाठी ९७ लाखांचा मोबदला
सेंट्रल पब्लिक हेल्थ एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग आॅर्गनायझेशन आणि मिनिस्ट्री आॅफ अर्बन डेव्हलपमेंट यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार डीपीआर बनविण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. त्यानुसार डीपीआर बनविणाऱ्या युनिटी कन्सल्टंटनी सर्व्हेक्षण करून पर्जन्य जल निचरा व्यवस्थेचा एजंसीने प्रिलिमिनरी डीपीआर सादर केला. त्यापोटी त्यांना ९७ लाखांचा मोबदलाही देण्यात आला आहे.
एकमुस्त
निधी नाहीच
अमरावती : त्यामुळे केवळ डीपीआरवर एक कोटीला तीन लाख रुपये कमी खर्च केलेला हा प्रकल्प तूर्तास तरी दिवास्वप्नच ठरला आहे. अमरावती महापालिकेचा समावेश ‘अमृत’मध्ये असला तरी ३७५ कोटींचा निधी एकमुस्त द्यायला केंद्र शासनानेही नकारघंटाच वाजवेल, अशी शंका पालिकेतील ज्येष्ठ अधिकारी व्यक्त करतात. पोहरा व चिरोडी टेकड्यांतून उगम पावलेले शहरातील मुख्य नाले, पूर्व-पश्चिम शहराच्या सखल भागातून वाहतात व शेवटी महापालिकेच्या क्षेत्राबाहेरील पेढी नदीला जावून मिळतात.