इच्छुकांच्या लगीनघाईने पालिकेचा मांडव गजबजला

By Admin | Updated: October 25, 2016 00:06 IST2016-10-25T00:06:21+5:302016-10-25T00:06:21+5:30

निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे.

Due to the incompetence of the wishes of the Municipal Corporation | इच्छुकांच्या लगीनघाईने पालिकेचा मांडव गजबजला

इच्छुकांच्या लगीनघाईने पालिकेचा मांडव गजबजला

जिल्हाभरात पालिकांना यात्रेचे स्वरुप : हवशा, नवशा, गवशांची चंगळ 
अमरावती : निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. कट्टयांवर निवडणुकीच्याच चर्चा रंगत आहेत. निवडणुकीच्या लगीनघाईमुळे ओस पडलेले जिल्हाभरातील पालिकेचे मांडव गजबजू लागले आहेत. यामुळे पालिकांना जत्रेचे स्वरूप आले असून प्रत्येकजण आपापले गणित जुळवून लॉबिंग करीत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील १९२ नगरपालिका व २० नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे मतदान २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून चोरी-चोरी चुपके-चुपके सुरू असलेले लॉबिंग आता उघडपणे दिसू लागले आहे. पालिका निवडणूक म्हणजे राजकीय क्षेत्रातील प्रवेशाचे पहिले पाऊल समजले जाते. यामध्ये आपापल्या भागात असणारे वजन तसेच नेतेगिरी यातून दाखवून देता येते.
पालिका निवडणुकीत एक-एक मत मोलाचे असल्याने गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनाही सुगीचे दिवस येतात. त्यातच यावेळी नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्षपदासाठीही थेट जनतेतून मतदान होणार असल्याने हवसे, नवसे गवस्यांची चांगलीच चंगळ होणार होणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पांढऱ्या कपड्यांची मागणी वाढली असून चौकाचौकात राजकीय समीकरणा बाबतच्या चर्चा रंगत आहेत. त्याचबरोबर इच्छुकांकडूनही गणित जुळविणे सुरू असून सर्वत्र पालिका निवडणुकीचीच रणधुमाळी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

इच्छुकांची पालिकेत वर्दळ
नगर पालिका क्षेत्रात वर्दळ वाढली आहे. निवडणुकीत आपणही कसे शर्यतीत आहोत, हेच दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहे. अनेक इच्छुकांनी निवडणुकीत अडचण नको म्हणून पालिकेची घरपट्टी, नळपट्टी व इतर काही देणे असेल तर ते भरण्याच्या अनुषंगाने विचारपूस सुरू केली आहे. एकंदरीत पालिकेचा मांडव इच्छुकांच्या लगीनघाईने गजबजू लागल्याचे दिसत आहे. लवकरच या निवडणुकीला रंगत येईल. नामांकन प्रक्रियेला सुरूवात झाली असली तरी खरी रंगत यापुढेच येणार आहे.

मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या
पालिकेच्या मागील पंचवार्षिक योजनेचा आढावा घेतल्यास प्रत्येक पालिकेत बोटावर मोजण्याइतपतच नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर तोंड उघडले. यातील बहुतांश लोक पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. इच्छुक मतदारांच्या गल्लोगल्ली जाऊन भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करीत आहेत.

Web Title: Due to the incompetence of the wishes of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.