बांधकामासह जलमापक योजनेत प्रचंड अपहार
By Admin | Updated: June 21, 2014 23:46 IST2014-06-21T23:46:10+5:302014-06-21T23:46:10+5:30
स्थानिक नगर परिषदेमध्ये झालेल्या विकासकामांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीतून होणारे बांधकाम निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

बांधकामासह जलमापक योजनेत प्रचंड अपहार
चांदूरबाजार : स्थानिक नगर परिषदेमध्ये झालेल्या विकासकामांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीतून होणारे बांधकाम निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आता या प्रकरणात खुद्द सत्तारूढ गटाच्या नगरसेवकाने उडी घेतली असून ११ प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी थेट राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. नगर पालिकेतील भ्रष्टाचारासाठी मुख्याधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून निलंबनाची मागणीही केली आहे.
एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी कार्यक्रमाच्या पायाभूत सुविधेंतर्गत कम्युनिटी हॉलचे बांधकाम एक महिन्यापूर्वी वॉर्ड क्र. १ मध्ये पालिकेने सुरू केले. त्यात इमारत बांधकामासाठी ४० खड्डे खणले. मात्र, त्यानंतर हे बांधकाम बंद करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसल्याचे कारण यासाठी सांगण्यात आले. मग परवानगी नसताना हे काम का सुरू करण्यात आले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या खड्डयात पाणी साचून प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तेराव्या वित्त आयोगांतर्गत पालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेमधून ५६ लाख रूपयांची घरोघरी नळ तेथे जलमापक यंत्र बसविण्यात आले. परंतु या योजनेत नियमितता नसल्यामुळे ती थंडबस्त्यात आहे. कंत्राटदाराने देयके काढून पोबारा केला आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला असून मुख्याधिकारी कक्षात ठिय्या देऊन चौकशीची मागणी केली होती. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्याकडे दिली होती. मात्र, त्यांचाही चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार कार्यक्रमांतर्गत शहरांमध्ये अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत काँक्रीट रस्ते व नाल्याची बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवक तिरमारे यांनी केला. या निकृष्ट बांधकामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी प्रधान सचिवांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय १९९५ पूर्वीचे अतिक्रमण नियमित करणे, झोपडपट्टीचे पट्टेवाटप करण्यात आलेल्यांची नोंद करणे, अनुसूचित जातीच्या लोकांना समाजकल्याण घरकुलांचा लाभ देणे, अनुकंपाधारकास पालिकासेवेत दाखल करणे, सेवानिवृत्तांची देय रक्कम त्वरित अदा करणे, पालिकेतील वर्ग ३ व इतर रिक्तपदे त्वरित भरणे, मातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरकुलांचा लाभ देणे आदी मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी प्रधान सचिवांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, प्रहार गटनेता व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (तालुका प्रतिनिधी)