ग्रामसेवकांच्या संपामुळे गावगाड्याचा कारभार ठप्प
By Admin | Updated: July 17, 2014 23:51 IST2014-07-17T23:51:35+5:302014-07-17T23:51:35+5:30
मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची

ग्रामसेवकांच्या संपामुळे गावगाड्याचा कारभार ठप्प
चांदूरबाजार : मागील पंधरा दिवसांपासून ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे. परिणामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा गावगाड्याचा कारभार पूर्णत: ठप्प झाला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनकडून होत आहे.
ग्रामसेवकांच्या संपामुळे तालुक्यातील ६० ग्रामपंंचायतींचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. यात रोजगार हमी योजना अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना, बीआरजीएफ योजना, शौचालय बांधकाम तेरावा वित्त आयोग योजना, वृक्षलागवड योजना, पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले यांच्यासह इतर सर्वच कामकाज ठप्प झाल्यामुळे गावगाड्याच्या विकासाचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.
२ जुलैपासून ग्रामसेवकांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता लागणारे जन्म तारखेचा दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांची फारच ओढाताण होत आहे. तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी दिवाबत्ती, सार्वजनिक आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आदी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा विस्कळीत झाल्या आहेत.
निर्मल भारत अभियानअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी अनुदानाची वाटपेही रखडली आहे. त्यामुळे शौचालयांची कामेही ठप्प पडली आहेत. त्याचप्रमाणे घरकुलाची देयके ही प्रलंबित आहेत. वृक्ष लागवडीची प्राथमिक स्वरुपाची कामे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणीही थांबली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची मजुरी व कुशल कामगारांची देयके मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोेष निर्माण झाला आहे.
आधीच तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींचा कारभार ४४ ग्रामसेवक पाहत आहेत. यात पाच ग्रामसेवक कंत्राटी असून ३९ ग्रामसेवक नियमित आहेत. यात ग्राम विकास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ग्रामसेवकांची संख्या कमी असल्यामुळे काही ग्रामसेवकांकडे २ ते ३ ग्रामपंचायतीचा कारभार एकाच ग्रामसेवकाकडे आहे. त्यामुळे रेंगाळलेला ग्रामपंचायतींचा कारभार या संपामुळे ढेपाळलेला आहे. यावर येत्या २ ते ३ दिवसांत यशस्वी तोडगा न निघाल्यास ग्रामीण नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या रोषाचे परिवर्तन उद्रेकात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)