मेळघाटात दरड कोसळण्याची भीती, पर्यटकांना धोक्याची संभावना

By Admin | Updated: August 5, 2015 00:34 IST2015-08-05T00:34:42+5:302015-08-05T00:34:42+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटात दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

Due to the fear of collapse in Melghat, tourists are likely to be in danger | मेळघाटात दरड कोसळण्याची भीती, पर्यटकांना धोक्याची संभावना

मेळघाटात दरड कोसळण्याची भीती, पर्यटकांना धोक्याची संभावना

लोकमत विशेष
नरेंद्र जावरे चिखलदरा
विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटात दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत दरड कोसळून येथे मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवडाभरापूर्वी दरडीचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मेळघाटातील अनेक रस्त्यांवर पहाड खचण्याची भीती वर्तविली जात आहे.
मेळघाटातील नागमोडी रस्ते दऱ्याखोऱ्यातून असल्याने रस्त्याच्या एकीकडे कुठे दरी तर दुसरीकडे पहाड अशी भौगोलिक स्थिती आहे. अशातच रस्त्याने ये-जा करणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांसाठी हे रस्ते जीवघेणे ठरले आहे. चिखलदरा तालुका विस्तीर्ण असला तरी तालुक्यातील बिहाली ते घटांग, घटांग ते कुकरु (मध्य प्रदेश), घटांग ते सेमाडोह, चिखलदरा ते आमझरी, मडकी ते लाँगपॉर्इंट या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. याच रस्त्यांवर पावसाळ्याच्या दिवसांत दरड कोसळण्याची भीती आहे.
अरुंद रस्ते ठरतेय जीवघेणे
मेळघाटातील अरुंद रस्ते वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणारे ठरत असल्याने संबंधित विभाग रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहे. रस्त्याच्या कडेला पटरीवर माती टाकण्यासाठी दोन्ही बाजूने मातीचे खोदकाम केले जात आहे. परिणामी टेकडीला कपारी पडत आहे. त्या कपारीवरील झाडे आणि मोठे दगड उघडे पडत असल्याने झिरपलेल्या पाण्यामुळे दरड कोसळण्याची सर्वाधिक भीती आहे. हा सर्व प्रकार मेळघाटात दिसून येतो.
पर्यटकांना सावधानतेचा इशारा
घटांग ते काटकुंभ मार्गावर मागील मंगळवारी पहाटे ४ वाजता अचानक दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने मोठा अपघात टळला. पावसाळ्यात चिखलदरा, सेमाडोह, कुकरु या पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. पावसात ओलेंचिंब होऊन निसर्गसौंदर्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात. स्वत:च्या दुचाकी, चारचाकी वाहने बेधुंद वाहनचालविण्याची स्पर्धा या नागमोडी रस्त्यांवर जीवघेणी ठरत आहे. अशा पर्यटकांनी रस्त्याच्या कपारीवर लक्ष देऊन वाहन चालविणे गरजेचे आहे.
एकच मार्ग सहा ठिकाणी धोकादायक
घटांग-काटकुंभ मार्गावर दरड कोसळल्यावर याच मार्गावर बंसी टर्न या पाऊण किलोमीटरच्या परिसरात सहा ठिकाणे अत्यंत धोकादायक ठरले आहे. मोठ्या प्रमाणात केव्हाही दरड कोसळून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महाकाय वृक्षांची अवैध कत्तल
धारणी-चिखलदरा या दोन्ही तालुक्यात घाटवळणाचे रस्ते आहेत. परंतु मार्गावरील महाकाय वृक्ष अवैधपणे तोडण्यात येत असल्याने दरड कोसळण्याला तेसुध्दा कारणीभूत ठरत आहेत. वृक्षांची जड माती पकडून ठेवत असल्याने धोका कमी प्रमाणात असते. मात्र, अवैध वृक्षतोड करताना बुंंध्यापर्यंत झाड कापल्याने मातीची पकड कमजोर होऊन दरड कोसळते.\\
असा पडतो पाऊस
चिखलदरा पर्यटनस्थळावर रिमझिम तर कधी धो-धो पाऊस कोसळतो. मात्र, मेळघाटच्या घनदाट अरण्यात संततधार व झिरपणारा पाऊस दरड कोसळण्यास कारणीभूत ठरत आहे. पावसाने सोमवारी हजेरी लावली. दोन दिवसांत डोंगरदऱ्यावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. अशातच रस्त्याच्या कपारीची माती वाहून जात आहे. त्यामुळे दरड कोसळण्याची भीती वाटत आहे.

Web Title: Due to the fear of collapse in Melghat, tourists are likely to be in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.