डीएफओंच्या कारवायांमुळे आरागिरणी मालक धास्तावले
By Admin | Updated: November 4, 2016 00:42 IST2016-11-04T00:42:49+5:302016-11-04T00:42:49+5:30
येथील उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मागील महिन्यात पोहरा जंगलात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून अवैध चराईवर अंकुश आणला.

डीएफओंच्या कारवायांमुळे आरागिरणी मालक धास्तावले
‘लक्ष्मी’ परत : आडजात लाकूड कटाई गुंडाळली
अमरावती : येथील उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मागील महिन्यात पोहरा जंगलात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून अवैध चराईवर अंकुश आणला. अंजनगाव सुर्जी, परतवाडा येथील आरागिरण्यांवर धाडसत्र टाकून गुन्हे दाखल केले. डीएफओंनी सुरु केलेल्या याधाडसी कारवायांमुळे जिल्ह्यातील आरागिरणी मालक धास्तावले आहेत. आडजात लाकूड कापण्याची मूक परवानगी मिळण्यापूर्वीच बोलणी फिस्कटल्याची माहिती आहे.
दरवर्षी दिवाळी आटोपताच जिल्ह्यातील आरागिरणी मालक आडजात लाकूड कटाईच्या परवानगीसाठी असोसिएशनच्या माध्यमातून ‘लक्ष्मी’ गोळा करतात. आरागिरणी मालकांचा हा जुना शिरस्ता आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी अमरावतीत उपवनसंरक्षकपदी रुजू झालेले हेमंत मीना यांनी वनविभागात अवैध कारभाराला लगाम बसविण्याचा चंग बांधला आहे. अतिक्रमणमुक्त जंगल कसे करता येईल, याचे नियोजन हेमंत मीना यांनी चालविले आहे. उपवनसंरक्षकांच्या धाडसी कारवायांमुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘सौदे’ फिस्कटत आहेत. तसेच उपवनसंरक्षकांनी आस्कमिक भेटी, धाडसत्र आरंभल्याने कनिष्ठ वनाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. दिवाळीपूर्वी पोहरा, चिरोडी जंगल उपवनसंरक्षक मीना यांनी दुचाकीवर फिरून पिंजून काढले होते, हे विशेष. थेट दुचाकीने जंगलात गस्त घालून कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा जाणून घेणारे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्या कार्यशैलीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद संचारला आहे.