गळ्यावर अनेक वार चिमुकला विद्यार्थी मरणासन्न
By Admin | Updated: August 8, 2016 23:54 IST2016-08-08T23:54:42+5:302016-08-08T23:54:42+5:30
लगतच्या पिंपळखुटास्थित श्री संत शंकर महाराज विद्यामंदिरात ११ वर्षीय विद्यार्थी रक्तबंबाळ स्थितीत रविवारी सकाळी आढळून आला.

गळ्यावर अनेक वार चिमुकला विद्यार्थी मरणासन्न
चौकशी सुरू : संत श्री शंकर महाराज विद्यामंदीर
धामणगाव रेल्वे : लगतच्या पिंपळखुटास्थित श्री संत शंकर महाराज विद्यामंदिरात ११ वर्षीय विद्यार्थी रक्तबंबाळ स्थितीत रविवारी सकाळी आढळून आला. त्याला गंभीर अवस्थेत नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या गळ्यावर वार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, ते वार त्याने स्वत: केलेत, की त्याच्यावर कुणी हल्ला केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
प्रथमेश सूर्यभान सगणे (११) हा अमरावती येथील रहिवासी आहे. तो पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज विद्यामंदिरात इयत्ता ५ वीत शिकत असून संस्थेच्याच वसतीगृहात राहतो. रविवारी शाळेला सुटी असल्याने सकाळच्या सुमारास वसतीगृहातील विद्यार्थी शाळा परिसरात खेळत होते. त्याचवेळी प्रथमेश शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला. ही बाब वसतिगृह अधीक्षकांच्या लक्षात आल्यानंतर प्रथमेशला प्रथम अमरावती येथील इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
प्रथमेशच्या गळ्यावर चिरल्याच्या खुणा आहेत. त्यामुळे त्याने स्वताच्या गळ्यावर वार केले की, त्याच्यावर अन्य कुण्या व्यक्तींनी हल्ला केला, या अनुषंगाने मंगरुळ दस्तगिर पोलिसांनी चौकशी आरंभली आहे. याबाबत वसतीगृहातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. प्रथमेशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की, त्यामागे अन्य कारण आहे. हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त पध्दतीने वसतीगृह, शाळा आणि संस्थेशी निगडित असलेल्यांची सुक्ष्म चौकशी सुरू केली आहे. दरम्यान प्रथमेशची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची माहिती चांदूररेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी दिली. तो अद्यापही बेशुद्धावस्थेतच असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात पोलीस प्रशासनावर कुठलाही दबाव नाही. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांविरुध्द निश्चितपणे कारवाई करण्यात येईल अशी, माहिती घाडगे यांनी दिली. दरम्यान मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (तालुका प्रतिनिधी)
या घटनेबाबत नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले. या विद्यार्थ्याने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला की, त्याच्यावर कुणी हल्ला केला, यादृष्टीने चौकशी आरंभली आहे.
- शैलेंद्र शेळके,
ठाणेदार, मंगरुळ दस्तगीर