विद्यार्थिनीच्या धाडसामुळे प्राध्यापकाचे ‘चाळे’ उघडकीस
By Admin | Updated: May 31, 2015 00:21 IST2015-05-31T00:21:52+5:302015-05-31T00:21:52+5:30
शहरातील एका प्राध्यापकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करुन तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे ...

विद्यार्थिनीच्या धाडसामुळे प्राध्यापकाचे ‘चाळे’ उघडकीस
हेल्पलाईनने दिली ताकीद : शहरातील नामांकित महाविद्यालयातील घटना
अमरावती : शहरातील एका प्राध्यापकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करुन तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरु केले. वर्षभरापासून हा प्रकार सुरु असल्यामुळे ती विद्यार्थिनी मानसिक तणावात आली. मात्र, अखेर एका डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार तिने धाडस करून प्राध्यापकाचे चाळे उघड केले. त्या विद्यार्थिनीला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईनने मदतीचा हात देऊन त्या रंगेल प्राध्यापकाला ताकीद दिली आहे.
शहरातील एका नामांकित महाविद्यालयात इंग्रजी वाड.मय विषयाच्या प्राध्यापकाने ओळखीतील एका विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केले. ओळखीतील प्राध्यापक असल्यामुळे ही बाब पीडित विद्यार्थिनीने कोणाला सांगितली नव्हती. मात्र, प्राध्यापकाचा त्रास वाढतच गेला. नंतर त्याने तिचे व्हिडिओ क्लिपिंग बनवून धमक्याही देणे सुरु केल्याने मुलगी मानसिक तणावात आली. तिची प्रकृती बिघडली. उपचार सुरू झाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही ती खरे कारण सांगू शकली नाही. डॉक्टरांनी तिच्यावर औषधोपचार सुरु केलेत. मात्र, उपयोग होत नव्हता. अखेर तिने मोठ्या धाडसाने डॉक्टरला हा सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी डॉक्टरांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईनकडे जाण्याचा सल्ला दिला. शेवटी तिने १५ मार्च रोजी हेल्पलाईनकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यावरून हेल्पलाईनचे पदाधिकारी संजय तिरथतकर व राजेश सांगोले यांनी त्या प्राध्यापकाला बोलावून घेतले. प्राध्यापकाने आपल्या चुकीची कबुली हेल्पलाईनसमोर दिली. तसेच यापुढे असा प्रकार न करण्याचे, हमीपत्री लिहून दिले. विद्यार्थिनीच्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला. नंतर याबाबतची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याला सुध्दा देण्यात आल्याचे पीडित मुलीने सांगितले. या मुलीचे हेल्पलाईनने कौतुुक केले आहे.