रासायनिक द्रव्यामुळे फळांचा राजा झाला विषारी
By Admin | Updated: April 21, 2015 00:06 IST2015-04-21T00:06:15+5:302015-04-21T00:06:15+5:30
सर्व फळांचा राजा असलेल्या आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

रासायनिक द्रव्यामुळे फळांचा राजा झाला विषारी
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : अन्न व औषधी प्रशासन उदासीन
सुरेश सवळे चांदूरबाजार
सर्व फळांचा राजा असलेल्या आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आंब्याच्या सेवनापासून मनुषाला अनेक फायदे होत असतात. परंतु आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यामुळे आता फळांचा राजा विषारी झाला आहे.
आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षांपासून आंब्याचे महत्त्व पटवून दिले होते. त्यासाठी गावाशेजारी नदी नाल्याच्या काठावरील शेतावर त्यांनी आम्रवृक्ष लावून ठेवले होते. तालुक्यातील अनेक गावे आमराईसाठी सर्व परिचित होते. या परिसरात मोठ्या आम्रवृक्षांचे वन मोठ्या प्रमाणात दिसत होते. परंतु सद्यस्थितीत होत असलेल्या वृक्षतोडीमुळे ग्रामीण भागातील अनेक आमराया नामशेष झालेल्या दिसत आहेत.
पूर्वी आंब्याला तणस, गवत किंवा झाडपाल्याचा वापर करुन पिकविले जात असायचे. त्यामुळे आंब्यातील नैसर्गिक गुण टिकून राहत होते. परंतु आता झटपट पैसे कमविण्याच्या नादात फळविक्रेते आंबे पिकविण्यासाठी कृत्रिम पध्दतीने रासायनिक पावडरचा वापर करीत असल्याने मानवाला अनेक आजाराने घेरलेले दिसत आहे. त्यामुळे फळांचा राजा आंबा हा गुणकारी नसून विषारी झाल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यात आंब्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. पाहुण्यासाठी पाहुणचार म्हणजे आंब्याच्या रसाची मेजवानी असते. विविध नावाने प्रसिध्द असलेल्या आंब्यांना विशेष मागणी असते. परंतु आंबा पिकविण्यासाठी रासायानिक कारपेटचा वापर करण्यात येतो. आंबे पिकविले जातात. याकडे अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या या मवाळ धोरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहे. या आंब्यांच्या सेवनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे दिसत आहे.
निर्यातबंदी झाल्यामुळे बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आंब्याच्या किमती कमी झाल्याचे दिसते. मात्र आंबा ज्या नैसर्गिक पद्धतीने पिकवायला पाहिजे त्या पध्दतीने न पिकविता रासायानिक द्रव्य किंवा कारपेटचा वापर करुन आंबे पिकविले जातात. त्यामुळे बाजारपेठेत आंबे स्वस्त असली तरी प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या आंब्याच्या सेवनाने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे, हे त्यांच्या उदासीन कार्यप्रणालीवरुन दिसून येत आहे.
ग्रामीण भागात रासायनिक प्रक्रिया करुन पिकविलेली फळे सर्रास पिकविली जात असताना आतापर्यंत अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकारी अशी फळे तपासणीसाठी इकडे फिरकलाच नाही तर कारवाईची अपेक्षा कोणाकडून करणार, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
कृत्रिमरीत्या आंबे पिकविणाऱ्यावर दाखल होणार गुन्हा
नैसर्गिक आंबा पिकविण्यासाठी २० ते २१ दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे आंबा लवकर पिकविण्यासाठी व्यापारी कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन जे आंबे पिकविले जातात, ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. या तंत्रामुळे आंब्याचा केवळ रंग बदलतो. हिरवा आंबा पिवळा होतो मात्र त्याची चव बदलत नाही. ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या व्यापारी कृत्यावर अन्न व औषधी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
अक्षय्य तृतीयेपासून वाढणार आंब्याचे भाव
अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका आंबे निर्माण होणाऱ्या गावांना बसल्यामुळे बाजारात आंब्याची आवक मंदावली आहे. २१ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे या पार्श्वभूमीवर २० एप्रिलपर्यंत आंब्याची आवक वाढण्याची अपेक्षा होत असली तरी यावर अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. उपलब्ध आंबा बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. मात्र फटका बसल्याने आवक कमी होते आहे. त्यात आंबा पिकविण्यासाठी पूर्वीची कॅल्शियम कार्बाईड वापरण्यास अन्न व औषधी प्रशासनाने मनाई केली आहे.