भाजपच्या बंडखोरीने काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळाले सभापतीपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:49+5:302021-02-05T05:23:49+5:30
पान २ चे बॉटम सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला तीन : वरूड पालिकेतील विषय समित्यांचे राजकारण वरुड : स्थानिक नगरपालिकेत सत्ताधारी भाजपला ...

भाजपच्या बंडखोरीने काँग्रेस, राष्ट्रवादीला मिळाले सभापतीपद
पान २ चे बॉटम
सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला तीन : वरूड पालिकेतील विषय समित्यांचे राजकारण
वरुड : स्थानिक नगरपालिकेत सत्ताधारी भाजपला बांधकाम, आरोग्य व महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळाले. तर राष्ट्रवादीला पाणीपुरवठा तर काँग्रेसला शिक्षण समिती सभापतीपद मिळाले. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीला भाजपचे नगरसेवक अनुमोदक, सूचक असल्याने बंडखोरी झाल्याची चर्चा आहे. पक्षाने व्हिप काढूनही बंडखोरी झाल्याने भाजपला खिंडार पडल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा स्वाती आंडे, शिक्षण सभापतीपदी प्रशांत धुर्वे, पाणीपुरवठा सभापतीपदी नुरोन्निसा मोबिनउद्दीन काझी, बांधकाम सभापती म्हणून नलिनी रक्षे, आरोग्य सभापती सुवर्णा तुमराम, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी छाया दुर्गे यांची निवड झाली. नगरपरिषदेवर भाजपची बहुमतात सत्ता असताना २९ जानेवारी रोजी झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला तीन समित्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक विषय समिती आली. २४ सदस्यीय नगरपरिषदेमध्ये भाजप बहुमतात आहे. भाजप १६ , काँग्रेस ४, राष्ट्रवादीकडे २, तर प्रहार आणि वरुड विकास आघाडीचा प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. परंतु, यावेळी बहुमतातील भाजपच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समर्थन दिले आहे. काँग्रेसच्या प्रशांत धुर्वे यांना भाजपचे देवेंद्र बोडखे यांनी अनुमोदन दिल्याने शिक्षण सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आले. तर राष्ट्रवादीच्या नुरोन्निसा मोबिनउद्दीन काझी यांना सूचक म्हणून भाजपच्या अर्चना आजनकर असल्याने पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपद राष्ट्रवादीला मिळाले. स्थायी समितीमध्ये पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा स्वाती आंडे तर सदस्यपदी नलिनी रक्षे, प्रशांत धुर्वे, नुरोन्निसा मोबिनउद्दीन काझी, सुवर्णा तुमराम, छाया दुर्गे, नरेंद्र बेलसरे, किशोर भगत, मनोज गुल्हाने यांची निवड झाली.
राजकीय चर्चांना उधाण
स्थानिक नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही महिन्यानंतर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली असताना विषय समिती सभापतीपद काँग्रेस राकॉंकडे आल्याने भाजपला मोठा धक्का असल्याचे राजकीय सूत्रांकडून बोलले जात आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रवींद्र पाटील उपस्थित होते.