पावसाअभावी सागवान वृक्षांवरील फुलोर ओसरला
By Admin | Updated: July 14, 2014 23:42 IST2014-07-14T23:42:29+5:302014-07-14T23:42:29+5:30
अमरावती : पावसाळा सुरु झाला की, मेळघाटात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. मात्र, यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने सागवान वृक्षांवर फुलोर बहरला नाही. त्यामुळे भविष्यात सागवान वृक्षांची संख्या कमी

पावसाअभावी सागवान वृक्षांवरील फुलोर ओसरला
गणेश वासनिक - अमरावती
अमरावती : पावसाळा सुरु झाला की, मेळघाटात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. मात्र, यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने सागवान वृक्षांवर फुलोर बहरला नाही. त्यामुळे भविष्यात सागवान वृक्षांची संख्या कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्मीळ वनौषधींचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा सध्या आभाळाकडे लागल्या आहेत. विदर्भाचे वनवैभव म्हणून नावरुपास आलेल्या मेळघाटात वन्यप्राणी, वृक्षे, झाडाझुडपांना देखील पावसाचे वेध लागले आहेत. पावसाळ्यात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. फुलोर बहरल्यानंतर काही दिवसांनी सागवान वृक्षांच्या बिया तयार होऊन त्या जमिनीवर पडतात. उन्हाळ्यात या बिया फुटून त्या जमिनीत शिरतात व पावसाळ्यात बिया अंकुरतात. या प्रक्रियेनुसार मेळघाटात सागवान वृक्षांची वाढ होते.
यंदा पावसाअभावी ७७२ वृक्ष प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येण्याचे चिन्हे आहेत. पाऊस नसल्याने मेळघाटात गवत प्रजाती उगवल्याच नाही. गवत उगवले नसल्याने गवतावर अवलंबून असलेल्या तृणभक्षी प्राण्याच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तृणभक्षी प्राण्यांना गवत नाही. त्यामुळे ही संख्या रोडावत चालली आहे. तर वाघांचे भक्ष असलेल्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी होत चालल्याने वाघांचे जीवन धोक्यात आले आहे. पावसावर एकुणच जीवनचक्र अवलंबून असून यंदा सागवान वृक्षांची संख्या कमी होणार असल्याने लाखो रुपयांचे वनविभागाचे नुकसान होण्याचे संकेत आहे. पावसाअभावी वृक्षांसह वन्यप्राणी, पशुपक्षांना नुकसान होण्याचे भाकित वनअधिकाऱ्यांनी वर्तविले आहे.