दोन्ही पायांनी अपंग रूपा देतेय दहावीची परीक्षा
By Admin | Updated: March 10, 2017 00:22 IST2017-03-10T00:22:30+5:302017-03-10T00:22:30+5:30
नजीकच्या वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य बालगृहातील रुपा ही दोन्ही पाय नसलेली मुलगी दहावीची परीक्षा देत

दोन्ही पायांनी अपंग रूपा देतेय दहावीची परीक्षा
जिद्दीची कहाणी : शंकरबाबांची मानसकन्या
परतवाडा : नजीकच्या वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य बालगृहातील रुपा ही दोन्ही पाय नसलेली मुलगी दहावीची परीक्षा देत असून अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकरांची मानसकन्या असलेल्या रूपाची जिद्द आणि चिकाटीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
जन्मत:च दोन्ही पाय नसलेल्या रूपाचा एक वर्षाची असतानाच जन्मदात्यांनी त्याग केला. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात बेवारस आढळलेल्या रूपाला बाल न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी वझ्झर येथील बालगृहात दाखल केले. येथे तिला शंकरबाबा पापळकरांच्या रूपाने वडील मिळाले आणि सन्मानाचे जीवनसुद्धा तिच्या वाट्याला आले. सद्यस्थितीत अमरावती येथील श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य तिच्या शिक्षणाचा खर्च करीत आहेत. रूपाचे प्राथमिक शिक्षण येथील नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळेत झाले आणि माध्यमिक शिक्षण आय.एस. गर्ल्स स्कूल परतवाडा येथे झाले. आता ती दहावीची परीक्षा देत आहे. याच बालगृहातील एक अनाथ मुलगी मंजुळा शंकरबाबा पापळकरसुद्धा रूपाची जिव्हाळ्याने काळजी घेतात. तिला नियमित शाळेत ने-आण करण्याचे कामही मंजुळाच स्वेच्छेने करते. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर गेली असता म्युन्सिपल हायस्कूलच्या शिक्षकांनी रूपाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्यात. (तालुका प्रतिनिधी)