कोरडवाहू पिके ‘कोमा’त
By Admin | Updated: July 15, 2015 00:03 IST2015-07-15T00:03:50+5:302015-07-15T00:03:50+5:30
मागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

कोरडवाहू पिके ‘कोमा’त
शेतकऱ्यांवर संकट : वरुणराजाने मारली तब्बल २७ दिवसांपासून दडी
जितेंद्र दखने अमरावती
मागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या पिकांची पेरणी झाली त्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. २४ जूनपासून पावसाने दीर्घ दडी मारली आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातील समाधानकारक पाऊस झाल्याने अवघ्या हजार ५ लाख ४३ हजार ४४७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने७६.१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अद्याप ३२०.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दडी मारल्याने अद्यापही १ लाख ७१ हजार ५०३ हेक्टरवर पेरण्या शिल्लक आहेत.
यंदा मात्र जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. ११ ते १७ जूनपर्यंत जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरुड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, भातकुली, अमरावती या तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात ५ लाख हजार ४३ हेक्टर ४७ क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र २४ जूनपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, तीळ, ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे.
काही पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. तर काही भागात पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने कोरडवाहू शेतातील दुबार पेरणीचे संकट कायम आहे. मागील २७ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे १ लाख ७१ ५०३ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस मात्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ओलिताखालील पिके काही प्रमाणात सुरक्षित
जिल्ह्यात मागील २७ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते पाणी देऊन पिके जगवीत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, अशा कोरडवाहू शेतातील पिके माना टाकू लागल्याने या आठवडाभरात पाऊस न आल्यास उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागेल.
गावागावांत रंगत आहेत पावसाचीच चर्चा
यंदा खरिपातील पेरण्या केल्यानंतर वरूणराजाने तब्बल चार आठवड्यांपासून पावसाने लांब दडी मारल्यामुळे गावोगावी केवळ पाऊस कधी येणार याचाच अंदाज घेणाऱ्या गप्पा गोष्टी रंगत आहेत.
हलक्या आणि मध्यम जमिनीतील पिके पाऊस नसल्याने करपून जातील, भारी जमिनीतील पिके तग धरून राहतील. मात्र कोरडवाहूसह सर्वच पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.
- दत्तात्रेय मुळे, कृषी अधीक्षक अधिकारी .