ड्रमभर पाणी ६० रुपयांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:48 IST2019-03-22T22:48:25+5:302019-03-22T22:48:46+5:30
तालुक्यातील शेंदोळा बुजरूक हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. मार्च महिन्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावातील सर्व विहिरी, बोर व तलाव आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे, तर खासगी पुरवठादाराकडून एक ड्रम पाण्यासाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.

ड्रमभर पाणी ६० रुपयांत
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील शेंदोळा बुजरूक हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. मार्च महिन्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावातील सर्व विहिरी, बोर व तलाव आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे, तर खासगी पुरवठादाराकडून एक ड्रम पाण्यासाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.
नागरिकांना हक्काचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याने शासनाच्या धोरणांबाबत नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.
सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या शेंदोळा गावात ग्रामपंचायतच्या तीन बोअर, सात हातपंप, सात सार्वजनिक विहिरी आहेत. हे जलस्रोत आटले, तर गावाला पाणीपुरवठा करणारा तलावही कोरडा पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. तूर्तास एका खासगी टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ते पाणी पुरेसे नाही. गतवर्षीसुद्धा शेंदोळा येथे दोन महिने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. हीच स्थिती यंदा ओढवते की काय, या भीतीने शेंदोळा ग्रामस्थांची गाळण उडाली आहे. तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
दहा दिवसानंतर पाणीपुरवठा
गावात दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने येथे खासगी टँकरद्वारे पाणी येत आहे. एक ड्रम पाण्यासाठी नागरिकांकडून ६० रुपये वसूल केले जातात. ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअर, विहिरी आटल्या. यामुळे १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मी स्वखर्चाने गावात टँकर लावला. प्रशासनाने आणखी टँकर लावून ही समस्या नियंत्रणात आणावी.
- वैशाली लसनापुरे
सरपंच, शेंदोळा बु