देवगावातून दारुची तस्करी
By Admin | Updated: December 31, 2014 23:17 IST2014-12-31T23:17:44+5:302014-12-31T23:17:44+5:30
यवतमाळ, वर्धा व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेचा संगम होणाऱ्या देवगाव पोलीस चौकीच्या साक्षीनेच वर्धा जिल्ह्यात दारुची तस्करी होत आहे. यवतमाळ ते पुलगाव पुढे

देवगावातून दारुची तस्करी
अमरावती : यवतमाळ, वर्धा व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेचा संगम होणाऱ्या देवगाव पोलीस चौकीच्या साक्षीनेच वर्धा जिल्ह्यात दारुची तस्करी होत आहे. यवतमाळ ते पुलगाव पुढे नागपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात बिअर बार थाटण्यात आले असून येथूनच वर्धेत दारु पोहचविली जात आहे. हा प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचे दिसून येते.
वर्धेत अमरावती येथून दारुची तस्करी ही बाब नित्याचीच असताना यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी होत असल्याचे स्पष्ट होते. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर दर अर्धा कि.मी.च्या अंतरावर बिअर बार थाटण्यात आली आहेत. हे सर्व बिअर बार वर्धेत दारु तस्करीच्या बेतानेच साकारण्यात आली आहे. या बिअर बारमध्ये बनावट दारु विक्रीची धूम आहे. यवतमाळ येथे दारुचे थोक विक्रेते असून पुलगाव राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बिअर बारमध्ये दर दोन ते तीन दिवसांनी १०० ते २०० दारुच्या पेट्यांची बुकींग कशाच्या आधारे केली जाते, हा संशोधनचा विषय आहे.
देवगावच्या पोलीस चौकीहून होणाऱ्या दारुमध्ये दिव- दमन येथील विना प्रमाणित दारुचा समावेश आहे. यवतमाळच्या सीमेवरुन दिव दमनची दारु बाभुळगाव होत देवगाव मार्गे पुलगाव, वर्धेत तस्करी होत असल्याची माहिती आहे.
विशिष्ट समुदायाने बिअर बार थाटून वर्धेत अवैध दारु विक्रीला इधान आणले आहे. अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरुनही वर्धेत दारु पोहचविली जात असताना यवतमाळ जिल्हाही दारु तस्करीत कोठेच मागे नसल्याचे स्पष्ट होते. हल्ली दारु पॅकिंग या प्लॉस्टिक बॉटलमध्ये होत असल्याने त्या फुटण्याची देखील भिती नाही. यवतमाळ, धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे मार्गे वर्धेत दारु तस्करीसाठी देवगाव पोलीस चौकी ही महत्वाची ठरत आहे. या चौकीतील पोलिसांना हाताशी ठेवले की, सहजतेने वर्धेत दारु पोहचविता येते. (प्रतिनिधी)