दुष्काळाची छाया गडद
By Admin | Updated: August 20, 2014 23:14 IST2014-08-20T23:14:00+5:302014-08-20T23:14:00+5:30
पावसाअभावी अमरावती जिल्ह्यातील खरिपाची पीकस्थिती भयावह झाली आहे. २७ जुलैनंतर थेट १९ व २० आॅगस्ट रोजी पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने पिकांना काही प्रमाणात संजीवनी मिळाली.

दुष्काळाची छाया गडद
१८ तालुक्यांत अत्यल्प पाऊस : उत्पादनात सरासरी २० टक्के घट
राजेश जवंजाळ /जितेंद्र दखने - अमरावती
अमरावती : पावसाअभावी अमरावती जिल्ह्यातील खरिपाची पीकस्थिती भयावह झाली आहे. २७ जुलैनंतर थेट १९ व २० आॅगस्ट रोजी पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने पिकांना काही प्रमाणात संजीवनी मिळाली. पण ३ ते ४ दिवस सलग पाऊस न बरसल्यास ही स्थिती आणखी गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे. हीच स्थिती कमी-जास्त प्रमाणात अमरावती विभागातील इतर चारही जिल्ह्यात आहे. त्यात यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे चित्र सर्वात भयंकर आहे. अमरावती विभागातील १८ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली.
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ३२.८४ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. यातील ९२ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक सोयाबीन, कपाशी व तूर पिकांचा समावेश आहे. मात्र, निसर्गाने साथ दिली नाही. अमरावती विभागात जून महिन्यात केवळ तीन दिवस पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्यात ११ दिवस व आॅगस्ट महिन्यात तीन दिवस पाऊस बरसला. तीन महिन्यांत केवळ १७ दिवस पावसाने हजेरी लावली. यामुळे पिके कोमेजून गेली आहेत.
१९ व २० आॅगस्ट रोजी अमरावती विभागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र, हा पाऊस पुरेसा नाही. त्यासाठी सलग दोन-तीन दिवस पावसाची गरज आहे. अन्यथा उर्वरित पीकही हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सद्यस्थितीत पिकांसाठी आवश्यक पाऊस बरसला तरी सरासरी उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली.
सोयाबीनचा
सर्वाधिक पेरा
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. एकूण १४,९८९ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १०,९८६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला. त्यापाठोपाठ ९,४३७ हेक्टर क्षेत्रात कापूस, तूर ३,४७५ व ज्वारीचा २,९०२ हेक्टर क्षेत्रापैकी ७७३ हेक्टर क्षेत्रात पेरा झाला. तसेच २०६० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६४३ हेक्टर क्षेत्रात मुगाचा पेरा झाला. या सर्व पिकांची स्थिती सध्या भयावह आहे.
भारनियमनाचाही जबर फटका
पावसाअभावी कोरडवाहू पिके तग धरुन असली तरी सिंचनाच्या सोई असलेल्या शेतकऱ्यांना देखील पिके वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. अशातच वीज वितरण कंपनीकडून भारनियमन व वेळोवेळी वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वाढल्यामुळे सिंचनाच्या सुविधा असतानाही पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण होत असल्याने पिके कशी वाचवावी, असे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.