अवकाळी पावसाने खरिपावर रोगांचे संकट !
By Admin | Updated: May 16, 2015 00:47 IST2015-05-16T00:47:38+5:302015-05-16T00:47:38+5:30
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत.

अवकाळी पावसाने खरिपावर रोगांचे संकट !
तीन वर्षांची स्थिती : रबी हंगामानंतर जमीन तापत नसल्याने विपरीत परिणाम
गजानन मोहोड अमरावती
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत. मशागतीनंतर किमान दोन महिने जमीन पुरेशी तापायला हवी. परंतु अवकाळी पावसामुळे जमीन तापण्यास पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी मातीचा पोत खराब होत आहे. यामुळे किडी, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर होऊ शकतो, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपासून अवकाळी पाऊस व गारपीटीचे सत्र सुरु आहे. विशेष म्हणजे २०१३ च्या मे अखेर ७६ मि.मी., २०१४ च्या मे अखेर १७० मि.मी. व यंदा १३ मेपर्यंत ९८ मि.मी. अवकाळी पाऊस पडला. यामुळे गहू, हरभरा व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वातावरणातील बदलाचा परिणाम निसर्गासह, शेतजमिन, पशुपक्षी व मानवी जीवनावर होत आहे. निसर्ग नियमानुसार वर्षाचे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा असे तीन ऋतू आहेत. परंतु निसर्गाचे चक्रच सध्या बदलेले आहे. मे महिन्यांपर्यंत अवकाळीचे थैमान असते तर जून महिन्यात पेरणीच्या काळात दोन महिने पावसाचा पत्ताच नसतो. पावसाळ्यात उन्हाची तीव्रता जाणवते तर उन्हाळ्यात पावसाळ्याचा भास होतो. यामुळे पिकांचीही शाश्वती नाही.
अवकाळी पाऊस
मान्सूनसाठी बाधक
उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस हा मोसमी वाऱ्यांसाठीही बाधक ठरणारा आहे. तापमान वाढल्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो. परंतु कमी-अधिक तापमान राहिल्यास त्याचा परिणाम पुढे सरकणाऱ्या प्रक्रियेवर होत असतो. इशान्य-नैर्ऋत्य पाऊस खेचण्यासाठी पोषक वातावरण लागते. अवकाळीने जमीन तापत नाही तसेच बाष्पीभवनही कमी प्रमाणात होते. त्यामुळे पाऊस लांबणीवर जातो. पावसाचे उशिरा होणारे आगमन ही त्याचीच प्रतिक्रिया असते. यालाच ऋतुमान बदल असेही आपण म्हणू शकतो. हा बदल अहितकारी आहे, अशी माहिती कृषितज्ज्ञांनी दिली.
जमिनीच्या आरोग्यावर परिणाम
एप्रिलमध्ये शेतीची मशागत होऊन मे अखेरपर्यंत ती तापायला हवी. यामुळे जमिनीत असलेले सुप्तावस्थेतील कीटक बाहेर पडून नष्ट होतात. परंतु अवकाळीमुळे त्यांना अनुकूल परिस्थिती लाभत आहे. त्यामुळे पिकांवर बुरशी, अळयांचा प्रादुर्भाव वाढतो. वैशाखातील ऊन जमिनीला मिळणे आवश्यक आहे. परंतु गेल्या ३ वर्षांपासून एप्रिल व मे महिन्यांत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट असल्याने जमीन तापत नाही. त्यामुळे कीड नष्ट होत नाही. याचा जमिनीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो.
जमिनीलाही हवी विश्रांती
जमिनीच्या विश्रांतीचा काळ हा मार्च ते मे अखेरपर्यंत असतो. या काळात जमिनीचे तापमान वाढलेले असते. यामध्ये जर अवकाळी पाऊस पडला तर मातीमधील वेगवेगळ्या प्रकारचे अंडीकुंज नष्ट होत नाहीत. त्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. जमीन मशागतीला पुरेसा अवधी मिळत नाही. जमीन थंड-गरम होत राहिल्याने जमिनीचा पोत खराब होतो.