स्वत:च्या ट्रकखाली चिरडून चालक ठार
By Admin | Updated: March 13, 2017 00:02 IST2017-03-13T00:02:34+5:302017-03-13T00:02:34+5:30
ट्रक दुरूस्तीचे काम करताना सिलिंडरच्या दुसऱ्या एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने स्वत:च्याच ट्रकखाली चिरडून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

स्वत:च्या ट्रकखाली चिरडून चालक ठार
अमरावती : ट्रक दुरूस्तीचे काम करताना सिलिंडरच्या दुसऱ्या एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने स्वत:च्याच ट्रकखाली चिरडून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. हा विचित्र अपघात शनिवारी रात्री नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील सावर्डी पुलाजवळ घडला. कल्लुराम गुजर (३८,रा.छिंदवाडा) असे मृताचे नाव आहे. कल्लुराम गुजर केमिकलने भरलेला ट्रक क्र. एम.एच.१४-सीपी-७५५४ घेऊन नागपूर मार्ग अमरावतीकडे येत होते. दरम्यान सावर्डी पुलाजवळ ट्रक खालून काही आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ट्रकमध्ये बिघाड झाल्याची शंका आल्याने चालक कल्लू गुजरने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि खाली उतरून ट्रक च्या खाली गेला.
ट्रक चालक ताब्यात
अमरावती : त्याचवेळी अचानक त्याच मार्गाने एम.एच.४० एन.-३३१६ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने कल्लू गुजर यांच्या ट्रकवर येऊन धडकला. त्यामुळे ट्रक खाली काम करणारा कल्लू गुजर हा स्वत:च्याच ट्रकखाली चिरडला गेला. अपघातास कारणीभूत असणारा ट्रकचालक संतोष सीताराम इंगळे (रा.नागपूर) हा नागपूरवरून अमरावतीकडे रिकामे सिलिंडर घेऊन येत होता. निष्काळजीपणे ट्रक चालवून त्याने कल्लू गुजरच्या ट्रकला जबर धडक दिली. याअपघातात कल्लू गुजर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. मृत कल्लू गुजरचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला गेला. येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. याघटनेत रामू धुर्वे (३८, रा. छिंदवाडा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)