वसंतराव नाईकांच्या स्वप्नातील कृषिक्रांती घडवा
By Admin | Updated: July 2, 2016 00:07 IST2016-07-02T00:07:49+5:302016-07-02T00:07:49+5:30
हरितक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सर्वत्र ओळख निर्माण केली आहे.

वसंतराव नाईकांच्या स्वप्नातील कृषिक्रांती घडवा
कृषीदिन : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन
अमरावती: हरितक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचा जन्मदिन १ जुलै हा कृषिदिन म्हणून साजरा करत असताना त्यांच्या स्वप्नातील कृषी क्षेत्रात क्रांती घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी केले. ते जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व कृषी जागृती सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती सरिता मकेश्र्वर, माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे, सदस्य अभिजित ढेपे, सीईओ सुनील पाटील, कृषी अधीक्षक अधिकारी दतात्रय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, आत्मा प्रकल्पाचे संचालक रवींद्र जाधव, डेप्युटी सीईओ जे.एन आभाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, वसंतराव नाईकांनी त्यांच्या कारकिर्दीत पंचायतराज संस्था, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार, धान्य खरेदी, संकरित बी-बियाणे यासारख्या शेतीशी निगडित उपक्रम राबवून शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला. वसंत बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाण्याचा स्त्रोत वाढण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या या कार्याची दखल घेत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शासनामार्फत शेतकरी हिताच्या अनेक नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र हे करताना शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना कृषी सप्ताहानिमित्त नव्हेतर त्या नियमित पोहोचविण्याची जबाबदारी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने पार पडावी, असे सांगितले. यावेळी जि.प. अध्यक्ष सतीश उईके यांनीही विचार मांडलेत. सीईओ सुनील पाटील, कृषी अधीक्षक दतात्रय मुळे यांनी प्रास्तावीक केले. संचालन क्षीप्रा मानकर, आभार आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र जाधव यांनी केले.