ग्रामसेवक आंदोलनावर तोडगा काढा : मनोहर जाधव
By Admin | Updated: July 3, 2015 00:38 IST2015-07-03T00:38:56+5:302015-07-03T00:38:56+5:30
जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले

ग्रामसेवक आंदोलनावर तोडगा काढा : मनोहर जाधव
अचलपूर : जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले मिळण्याची प्रक्रियाच ठप्प झाल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा विकासकामांवर परिणाम झाल्याने ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा तोडगा काढण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केले आहे.
ग्रामसेवकांनी अंजनगाव तालुक्यातील निलंबित ग्रामसेवकाला पुन्हा कामावर रुजू करण्यासह इतर काही मागण्यांसाठी जिल्हाभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळणे बंद झाले आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले दाखलेसुध्दा लाभार्थ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून नापिकीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.
ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची परवड होत आहे. या बाबीचा विचार करून आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. योग्य तोडगा काढून ग्रामसेवकांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी पर्याय शोधण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)