रेती उत्खननामुळे ‘पाणीबाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:02+5:30
चार वर्षांपासून तालुका पाण्याअभावी दुष्काळात होरपळतो आहे. या भागातील विहिरी उन्हाळ्यापूर्वीच आटल्या आहेत. ३००-३५० फूट खोल खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागत होते. मात्र, ती पातळी आता १००० ते १५०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहानूर नदीचे खोलीकरण व जलसंधारण महत्त्वाचे होते. मात्र, तसे झाले नाही. १० ते १५ वर्षांपूर्वी शहानूर नदीचे पात्र अतिशय व्यापक होते.

रेती उत्खननामुळे ‘पाणीबाणी’
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : शहरालगतच्या शहानूर नदीचे पात्र रेतीतस्करांनी लक्ष्य केले आहे. नदीपात्रातील हजारो ब्रास रेतीची अवैधरीत्या उत्खनन करून अवैध वाहतूक केली जाते. येथील शहरवासीयांसह अकोटकडे जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेतून ही रेतीचोरी सुटत नाही. मात्र, महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. या रेती उत्खननामुळे तालुक्यावर ‘पाणीबाणी’ ओढविण्याचे दाट संकेत आहेत.
चार वर्षांपासून तालुका पाण्याअभावी दुष्काळात होरपळतो आहे. या भागातील विहिरी उन्हाळ्यापूर्वीच आटल्या आहेत. ३००-३५० फूट खोल खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागत होते. मात्र, ती पातळी आता १००० ते १५०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहानूर नदीचे खोलीकरण व जलसंधारण महत्त्वाचे होते. मात्र, तसे झाले नाही. १० ते १५ वर्षांपूर्वी शहानूर नदीचे पात्र अतिशय व्यापक होते. पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर होत होता. मात्र, अलीकडे शहानूर नदीपात्राला रेतीतस्करांची नजर लागली आहे. या नदीपात्रातून रोज हजारो ब्रास रेती काढली जाते. त्याची दिवसाढवळ्या वाहतूक केली जाते. त्यासाठी बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर वापरले जातात. नदीपात्रात मोठमोठे खड्डे रेती उत्खननाचे पुरावे ठरले आहेत. लाखो रुपये खर्च करुन नगरपालिकेच्या वतीने १५ वर्षांपूर्वी खोडगाव मार्गावरील नर्सरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. ती नर्सरी आज आॅक्सिजन पार्क म्हणून दिमाखात उभी आहे. मात्र, या नर्सरीमधील झाडांच्या बुंध्यातून रेती चोरीला गेली. महसूल प्रशासनाने रेती तस्करांवर अंकुश लावला नाही, तर ही नर्सरीसुद्धा नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, ना तहसीलदार फिरकले, ना त्यांचे अधिनिस्थ पथक. त्यामुळे कारवाई कोण करेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खोडगाव, देवगाव मार्गावरील शहानूर पात्रातील, नाल्यातील रेतीचे उत्खनन अतिशय चुकीचे आहे. तहसीलदार कारवाई करीत नसतील, तर आपण स्वत: पाहणी करून रेतीचोरांविरूद्ध कारवाई करू.
- प्रियंका आंबेकर,
उपविभागीय अधिकारी, दर्यापूर