डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला पाच हजारांचा दंड
By Admin | Updated: May 7, 2015 00:07 IST2015-05-07T00:07:52+5:302015-05-07T00:07:52+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शिवाजी संस्थेद्वारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला ...

डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला पाच हजारांचा दंड
अमरावती : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शिवाजी संस्थेद्वारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींनी विद्यापीठाकडे दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे.
माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींना अधिष्ठाता पदावर रुजू करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले होते. मात्र, संस्था चालकाने सोमवंशींना रुजू होऊ दिले नाही. महिनाभरापासून अधिष्ठातापदाचे ‘रुजू’ नाट्य सुरुच होते. त्यामुळे सोमवंशींनी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाद मागण्यासाठी ६ एप्रिल रोजी पत्र पाठविले होते. यावर विद्यापीठाने पीडीएमसी प्रशासनाला उत्तर मागितले होते. मात्र, पीडीएमसीकडून नाशिक विद्यापीठाला काहीच कळविले गेले नाही. ही बाब गंभीर असल्याचे विद्यापीठाद्वारे प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे. याच श्रुंखलेत सोमवंशींनी २० एप्रिल रोजी पुन्हा ई-मेलद्वारे पत्र पाठवून रूजू करून घेण्याबाबत होणारी हयगय आणि गलथान कारभाराबद्दल नाशिक विद्यापीठाला कळविले होते. त्यानंतर नाशिक विद्यापीठाने पीडीएमसी व्यवस्थापनाने आदेशांची अवहेलना केल्याची गंभीर दखल घेऊन याप्रकरणी पीडीएमसीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
१५ दिवसांच्या आत विद्यापीठाकडे दंड पाठविण्यात यावा. अन्यथा विद्यापीठ निर्देश क्रमांक ०५/२०१२ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्याचा इशारा देखील नाशिक विद्यापीठाने दिला आहे. याबाबतचे पत्र कुलसचिव काशिनाथ गर्कळ यांनीे पीडीएमसी प्रशासनाला पाठविले आहे. (प्रतिनिधी)
वारंवार दंडात्मक कारवाई
डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या ना त्या कारणांनी सतत चर्चेत असते. डॉ.भाऊसाहेब देशमुखांनी सामान्यांच्या गरजांसाठी उच्चशिक्षणाची सोय अमरावतीत करून दिली. परंतु येथे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. परिणामी वारंवार दंडात्मक कारवाईची नामुष्की ‘पीडीएमसी’ वर येत आहे. आतापर्यंत अनेकदा अशी कारवाई महाविद्यालयावर झाली आहे.