लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभरापासून अमरावती शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचा अतिरिक्त अधिष्ठाता (डीन) पदावर कार्यरत असलेले डॉ. किशोर इंगोले यांचा कार्यभार संपुष्टात आला आहे.
त्यांच्या जागी आता डॉ. नंदकिशोर राऊत हे अमरावतीचे नवे अधिष्ठाता राहणार आहेत. नागपूर शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. राऊत यांची पदोन्नतीने अधिष्ठातापदी निवड झाली आहे. यासंदर्भात ४ नोव्हेंबरला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या शासन निर्णय जारी केला आहे.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर १ ऑगस्ट २०२३ रोजी डॉ. अनिल बत्रा यांच्याकडे महाविद्यालयाच्या अतिरिक्त अधिष्ठाता पदाचा कार्यभार देण्यात आला होता. डॉ. बत्रा यांनी कार्यभार स्वीकारताच महाविद्यालयाला 'एनएमसी'ची मंजुरी मिळविण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर शासनाने ५ सप्टेंबर रोजी डॉ. बत्रा यांचा कार्यभार संपुष्टात आणून त्यांच्या जागी डॉ. किशोर इंगोले यांच्याकडे अतिरिक्त अधिष्ठाता पदाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. किशोर इंगोले यांच्या कार्यकाळातच महाविद्यालयातील 'एमबीबीएस'चे पहिले शैक्षणिक वर्ष सुरू झाले. अशातच महाविद्यालय यंदाच्या दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेत्ररोग विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. नंदकिशोर राऊत यांची पदोन्नतीने अमरावती शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत ते आपला कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
वैद्यकीय महाविद्यालयाचीही कामे बाकी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दुसरे वर्ष सुरू होत असल्याने नव्याने रुजू होणारे डॉ. नंदकिशोर राऊत यांची जबाबदारी देखील वाढणार आहे. त्यांना प्रामुख्याने जिल्हा रुग्णालय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात घ्यावे लागणार आहे. अजूनही सुरू न झालेल्या महाविद्यालयाच्या स्वतःच्या इमारतीच्या बांधकामाविषयी पाठपुरावा करावा लागणार आहे. तसेच नव्याने प्रवेशित होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहाची सुविधा, महाविद्यालयाला आवश्यक मनुष्यबळ मिळविण्याची कामे करावी लागणार आहेत.
"सध्या मी रजेवर आहे. १० नोव्हेंबरला मी नागपूरला जॉइन होईल आणि त्यानंतर तेथील जबाबदारी सोडल्यावर मी अमरावतीमध्ये लवकरच नवा कार्यभार स्वीकारेल."- डॉ. नंदकिशोर राऊत, नवे अधिष्ठाता, अमरावती मेडिकल कॉलेज
Web Summary : Dr. Nandkishore Raut is the new dean of Amravati Medical College, succeeding Dr. Kishore Ingole. Raut, previously in Nagpur, will soon assume responsibilities, including overseeing hospital administration, construction, and student facilities as the college enters its second year.
Web Summary : डॉ. नंदकिशोर राऊत अमरावती मेडिकल कॉलेज के नए डीन बने, उन्होंने डॉ. किशोर इंगोले की जगह ली। नागपुर में कार्यरत राऊत जल्द ही अस्पताल प्रशासन, निर्माण और छात्र सुविधाओं का निरीक्षण करेंगे, क्योंकि कॉलेज अपने दूसरे वर्ष में प्रवेश कर रहा है।