डॉ. दिलीप मालखेडे असतील अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरु?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:08+5:302021-09-06T04:17:08+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे नवीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे असतील, तशा वेगवान हालचाली मुंबई येथील ...

डॉ. दिलीप मालखेडे असतील अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरु?
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे नवीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे असतील, तशा वेगवान हालचाली मुंबई येथील राजभवनात सुरू झाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपसचिवांकडून आलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेणार असल्याची माहिती आहे.
अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीसाठी समितीचे गठन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. १२० पैकी २० उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती पार पङल्या. सरतेशेवटी निवड समितीने शॉर्ट लिस्टनुसार पाच उमेदवारांची कुलगुरूपदाच्या निवडीसाठी यादी तयार करून राज्यपालांकडे पाठविली आहे. यात डॉ. दीपक धोटे (अमरावती), डॉ. उमेश कदम (दिल्ली), डॉ. कारभारी काळे (औरंगाबाद), डॉ. दिलीप मालखेडे (दिल्ली), डॉ. नंदकिशोर ठाकरे (मानोरा, वाशिम) या पाच नावांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
--------------------
राज्यपाल करणार नियुक्ती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुढील आठवड्यात कुलगुरूपदी डॉ. मालखेडे यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती आहे. डॉ. मालखेडे हल्ली दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेत सल्लागारपदी कार्यरत आहेत. यापूर्वी ते पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात असोशिएट प्रोफेसरपदी कार्यरत होते.