डॉ.भाऊसाहेब देशमुखांचा जयंत्युत्सव शुक्रवारपासून
By Admin | Updated: December 16, 2015 00:10 IST2015-12-16T00:10:05+5:302015-12-16T00:10:05+5:30
शिक्षणमहर्षि डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

डॉ.भाऊसाहेब देशमुखांचा जयंत्युत्सव शुक्रवारपासून
विविध कार्यक्रम : २७ ला गडकरींची उपस्थिती
अमरावती : शिक्षणमहर्षि डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन १८ ते २७ डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे. २७ डिसेंबर रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंत्युत्सवानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये पुष्पांजली, मानवंदना आणि डॉ.पंजाबराव जन्मशताब्दी स्मृती महापौर सुवर्णपदक, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व उत्कृष्ठ शाळा पुरस्कार तसचे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिकांची घोषणा, शिवसंस्था त्रैमासिक व दैनंदिनी २०१६ चे विमोचन आणि शिवाजी कृषी पर्यटन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.प्रवीण पोटे, खा.आनंद अडसूळ, आ.सुनील देशमुख, महापौर चरणजितकौर नंदा आदी गणमान्य उपस्थित राहतील.
संस्था विकासासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’
१९३६ साली स्थापन झालेली श्री शिवाजी शिक्षण संस्था २०३६ साली शतकमहोत्सव साजरा करणार आहे. २०३६ पर्यंत श्री शिवाजी शिक्षण संस्था कशी असावी, यासाठी संस्थेच्या प्रत्येक घटकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वर्गशिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य अािण शिवपरिवाराशी संलग्न सर्वांकडून अभ्यासपूर्ण प्रस्ताव मागविले जाणार आहेत. या सर्वसमावेशक अहवालानंतर संस्थेचे २०३६ सालच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ ला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती संस्थाध्यक्ष अरुण शेळके यांनी दिली. संस्थेचे ‘अॅटानॉमी’साठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.