‘डबलिंग रेट’ धोक्याच्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST2021-02-26T04:17:47+5:302021-02-26T04:17:47+5:30

गजानन मोहोड अमरावती : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी धोक्याच्या वळणावर आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ ...

‘Doubling rate’ at risk | ‘डबलिंग रेट’ धोक्याच्या वळणावर

‘डबलिंग रेट’ धोक्याच्या वळणावर

गजानन मोहोड

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी धोक्याच्या वळणावर आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारीला २६६ दिवसांवर असणारा ‘डबलिंगचा रेट’ २५ फेब्रुवारीला १६१ दिवसांनी कमी होऊन तो १०५ दिवसांवर आलेला आहे. अलीकडे रुग्णसंख्या वाढल्याने ९७ वर असणारा रिकव्हरी रेटदेखील माघारला आहे. सद्य:स्थितीत कोरोनामुक्तीचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्क्यांवर आल्याचे वास्तव आहे.

कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती. आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे. त्यानुसार, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागला आहे. एका दिवसात तब्बल १६१ दिवसांनी कमी होणे म्हणजेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे द्योतक आहे.

जिल्ह्यात एप्रिलमध्ये पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ३२६ दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारीला कोरोनाग्रस्तांची संख्या ३१,९२५ वर पोहोचली आहे. म्हणजेच, दरदिवशी सरासरी ९७.२२ कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख नोव्हेंबर व डिसेंबर महिने वगळता चढताच राहिला आहे. १६ मे रोजी म्हणजेच पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्याच्या ४२ दिवसांत १०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर, १३ दिवसांत म्हणजेच २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०२ झाली. त्यानंतर, १९ जूनला ४०६ व ११ जुलैला ८२१० वर पोहोचली. २४ जुलै रोजी १६०८ वर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली. हा कालावधी केवळ १३ दिवसांचा होता. ११ ऑगस्टला ३२०९, ४ सप्टेंबरला ६४०९ व २५ सप्टेंबरला १२,२३३ पोहोचली होती. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संक्रमण कमी आल्याने ‘डबलिंग रेट’ माघारला व ३०० वर गेला होता. आता १ फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाचा धमाका सुरू झाल्याने हा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागल्याची धोक्याची घंटा आहे.

बॉक्स

‘डबलिंग रेट’ नियोजनासाठी महत्त्वाचा

कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा प्रशासनासाठी फार महत्त्वाचा असतो. यासंदर्भात सातत्याने आढावा घेतला जाऊन नियोजन ठरविले जाते. कोरोना संसर्गामुळे किती दिवसांत किती रुग्ण वाढले, याचा अंदाज प्रशासनाला येऊन आवश्यक त्या उपाययोजना व सुविधांची निर्मिती केली जाते. हॉस्पिटल, बेडसंख्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी यांचे नियोजन केले जाते.

बॉक्स

कोरोनाचा उद्रेक, रिकव्हरी रेट माघारला

नोव्हेंबर २०२० पासून जिल्ह्यात संक्रमणमुक्त रुग्णांचे प्रमाण राज्यात अव्वल ९६ ते ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र, जानेवारीनंतर रुग्णसंख्या वाढायला लागली व फेब्रुवारी महिन्यात रोज कोरोनाचा उद्रेक होत असल्याने ‘रिकव्हरी रेट’ म्हणजेच एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५.३८ टक्क्यांवर पोहोचले असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

बॉक्स

रुग्णसंख्येत वाढ, मृत्युदरात कमी

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या २४ दिवसांत तब्बल १० हजार रुग्णांत वाढ झालेली आहे. त्यामुळे आता मृत्युदरात कमी आलेली आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये आठ टक्क्यांवर असणारा मृत्युदर नंतर कमी होत दोन टक्क्यांवर स्थिरावला होता. मध्यंतरी, काही पाॅइंटने वाढ झालेली होती. आता फेब्रुवारीच्या २४ दिवसांत ६३ रुग्णांची नोंद झाली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्याने मृत्युदर १.५१ टक्क्यांवर आलेला आहे.

पाॅइंटर

दिनांक संक्रमित एकूण कोरोनाग्रस्त डबलिंग रेट

२४ फेब्रुवारी ८०२ ३१,९२५ १०५

२३ फेब्रुवारी ९२६ ३१,१२३ २६६

२२ फेब्रुवारी ६७३ ३०१९७ २६६

२१ फेब्रुवारी ७०९ २९,५२४ २६६

२० फेब्रुवारी ७२७ २८,८१५ २६६

Web Title: ‘Doubling rate’ at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.