विद्यापीठाच्या परीक्षांना काही अर्थ आहे काय? गुणी विद्यार्थ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:01 IST2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:01:02+5:30
यूजीसीच्या निकषानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. मात्र, या ऑनलाईन परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता अनेक लोक उपस्थित करीत आहेत. कारण या परीक्षा ऑनलाईन आहेत. या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या व घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विद्यापीठाचे कोणतेही मॉनिटरिंग नाही. कोण परीक्षा देत आहे, याची खातरजमा होत नाही. कशी परीक्षा दिली जात आहे, ते माहीत नाही.

विद्यापीठाच्या परीक्षांना काही अर्थ आहे काय? गुणी विद्यार्थ्यांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० परीक्षा जून-जुलै महिन्यात आटोपल्या. आता ऑगस्ट महिन्यात उन्हाळी-२०२१ परीक्षेचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. परंतु, हिवाळी-२०२० परीक्षेचे नियोजन, परीक्षेची पद्धती, परीक्षेची अंमलबजावणी व त्याचे स्वरूप लक्षात घेता विद्यापीठाच्या या ऑनलाईन परीक्षांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे वास्तव आहे. यात गुणी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड आहे.
यूजीसीच्या निकषानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. मात्र, या ऑनलाईन परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता अनेक लोक उपस्थित करीत आहेत. कारण या परीक्षा ऑनलाईन आहेत. या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या व घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विद्यापीठाचे कोणतेही मॉनिटरिंग नाही. कोण परीक्षा देत आहे, याची खातरजमा होत नाही. कशी परीक्षा दिली जात आहे, ते माहीत नाही. हिवाळी-२०२० परीक्षेतील अनेक विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवरून कॉन्फरन्सिंगद्वारे पेपर सोडवल्याचे सांगत आहेत. पुस्तक उघडून अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. हीच स्थिती उन्हाळी-२०२१ परीक्षेची राहणार आहे. महाविद्यालयाकडून परीक्षेसाठी पेपरची लिंक देण्यात येत असल्याने ‘जवळ’च्या अनेक विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नांची उत्तरे माहीत असतात. अशा विद्यार्थ्यांनी पेपरची लिंक दिल्यानंतर अवघ्या १०-१५ मिनिटांत पेपर सोडवून तो पेपर सबमिट केल्याची माहिती आहे. परीक्षेची गोपनीयता केवळ नाममात्र आहे. परीक्षेसाठी पेपरची लिंक विद्यापीठाने दिली, तर या गोष्टीला आळा बसू शकतो. पण, विद्यापीठाने ती जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवलेली आहे. त्यामुळे सर्व घोळ सुरू आहे. कशीबशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा ‘निकाल’ लावणे एवढेच विद्यापीठाचे धोरण दिसून येत आहे. त्यामुळे अशा परीक्षांना काही अर्थ आहे काय, असा प्रश्न आता गुणी विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.
कोरोना संसर्गामुळे केंद्रावर परीक्षा घेता येत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषाचे पालन करून विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. प्राप्त परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या हितानुसार परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ
ज्या विद्यार्थी कधी महाविद्यालयाचे तोंड पाहिले नाही, त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. ही बाब गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. कोरोनाचा बागुलबुवा थांबयला हवा. ऑफलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाेर यावी.
- समीर वानखडे, अमरावती.