डॉक्टरांना आता नवीन प्रिस्क्रिप्शनची अंमबलजावणी बंधनकारक
By Admin | Updated: January 3, 2015 00:23 IST2015-01-03T00:23:56+5:302015-01-03T00:23:56+5:30
डॉक्टरांच्या हस्ताक्षरातील प्रिस्क्रिप्शनमुळे अनेकदा गोंधळ होतो. हे टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रिस्क्रिप्शनचा आदर्श नमुनाच जारी केला होता.

डॉक्टरांना आता नवीन प्रिस्क्रिप्शनची अंमबलजावणी बंधनकारक
अमरावती : डॉक्टरांच्या हस्ताक्षरातील प्रिस्क्रिप्शनमुळे अनेकदा गोंधळ होतो. हे टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रिस्क्रिप्शनचा आदर्श नमुनाच जारी केला होता. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होणार आहे. यापुढे एफडीएने दिलेल्या आखीव नमुन्यातच डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहावे लागणार आहे.
डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनमध्ये सुसूत्रता असावी, अन्न व औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील तरतुदीनुसार प्रिस्क्रिप्शन असावे यासाठी एफडीए, इंडियन मेडिकल असोसिएशन, होमिओपॅथी डॉक्टर संघटना, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या संमतीने प्रिस्क्रिप्शनचा आदर्श नमुना तयार करण्यात आला आहे. हा नमुना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २८ फेब्रुवारीला प्रकाशित करण्यात आला असला तरी अद्याप प्रत्यक्ष वापरात आलेला नाही. मात्र नव्या वर्षात हा नियम लागू होईल.
प्रिस्क्रिप्शन ए ५ या आकाराच्या कागदाचे असावे. त्यात डॉक्टरचे संपूर्ण नाव, पदवी, संबंधित परिषदेला दर्शविणारी आद्याक्षरे, नोंदणी क्रमांक, पत्ता आणि ई-मेल, दूरध्वनी क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. प्रिस्क्रिप्शनचा क्रमांक, तारीख, रुग्णाचे संपूर्ण नाव, पद, लिंग, वजन, पत्ता त्याचा संपर्क क्रमांक डॉक्टरांना लिहावा लागणार आहे. प्रिस्क्रिप्शनवर आर एक्सची नोंद आवश्यक आहे. औषध कॅप्सूल, सिरप, क्रीम कोणत्या स्वरुपात आहेत याचा प्रवर्ग स्पष्ट करावा लागणार आहे. औषधांचे संपूर्ण प्रमाण, सेवनाचा कालावधीही व्यवस्थित लिहिणे बंधनकारक आहे.