डॉक्टरांचा हलगर्जीपणा, महिलेची रस्त्यावरच प्रसूती!
By Admin | Updated: July 20, 2015 00:03 IST2015-07-20T00:03:25+5:302015-07-20T00:03:25+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयात आलेल्या एका गर्भवती महिलेची डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उघड्यावरच प्रसूती झाली.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा, महिलेची रस्त्यावरच प्रसूती!
अनागोंदी : जिल्हा शल्यचिकित्सकांना दिली माहिती
नांदगाव खंडेश्वर : येथील ग्रामीण रूग्णालयात आलेल्या एका गर्भवती महिलेची डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उघड्यावरच प्रसूती झाली. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली.
विस्तृत माहितीनुसार, रोहणा येथील एका महिलेला प्रसूतीसाठी नांदगाव खंडेश्वरच्या ग्रामीण रूग्णालयात आणले होते. परंतु तिला रूग्णालयात दाखल न करून घेता येथील डॉक्टरांनी अमरावतीला नेण्याचा सल्ला दिला. परंतु असह्य प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या त्या महिलेला कळा सोसवल्या नाहीत. रूग्णालयाच्या बाहेर येताच ती महिला प्रसूत झाली. या घटनेची माहिती मिळताच युवासेनेचे प्रकाश मारोटकर, जि.प. सदस्य निशांत जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तेथे उपस्थित डॉक्टर व नर्स यांना त्यांनी धारेवर धरले. त्यामुळे धास्तावलेल्या ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला ग्रामीण रूग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार सुरू केले.
प्रकाश मारोटकर यांनी या घटनेची माहिती दूरध्वनीवरून जिल्हा शल्य चिकित्सकांना दिली. इतकेच नव्हे, तर घटनेची माहिती प्रसूत महिलेच्या नातलगांनी नातलगांना व पोलिसांनादेखील दिली. वृत्त लिहिस्तोवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत. (तालुका प्रतिनिधी)