धामणगावात डॉक्टरांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:17 IST2017-11-02T22:16:50+5:302017-11-02T22:17:28+5:30
वैद्यकीय व्यावसायिक सकलेचा दाम्पत्याच्या रुग्णालय व वाहनांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी गुरुवारी बंद पुकारला.

धामणगावात डॉक्टरांचा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : वैद्यकीय व्यावसायिक सकलेचा दाम्पत्याच्या रुग्णालय व वाहनांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी गुरुवारी बंद पुकारला. या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दत्तापूर पोलीस ठाण्यात तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.
शहरातील अशोक व सारिका सकलेचा या वैद्यकीय व्यावसायिक दाम्पत्याच्या रुग्णालयात १२ वर्षाची चिमुकली बुधवारी दगावली. त्यासाठी सकलेचा यांनी केलेला चुकीचा उपचार जबाबदार असल्याचा रोष व्यक्त करीत ५० हून अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या जमावाने रुग्णालयाची तोडफोड तसेच तेथील साहित्याची व वाहनांची जाळपोळ केली. या घटनेमुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली असल्याचे धामणगाव मेडिकल असोसिएशनने गुरुवारी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन (प्रीव्हेन्शन आॅफ व्हायलंस अँड डॅमेज आॅफ प्रॉपर्टी) अॅक्ट २०१० अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली.
जाळपोळीच्या निषेधार्थ वैद्यकीय व्यावसायिकांनी दिवसभर बंद पाळला. जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच दत्तापूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनावर धामणगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष भरत पालीवाल, सचिव असित पसारी, आय.एन. अग्रवाल, पी.ए. राठी, ए.पी. भैया, डी.आर. गुप्ता, पी.एस. पाटील, एस.पी. राठी, आर.बी. वाटाणे, ए.एन. जगताप, एम.ए. जगताप, सी.ए. नागपुरे, विशाल डोफे, एल.एल. भुतडा यांची स्वाक्षरी आहे.
७० जणांविरूद्ध गुन्हे दाखल
डॉ. अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात तोडफोड व परिसरात जाळपोळ केल्याप्रकरणी ७० हून अधिक जणांविरुद्ध भादंविचे कलम ४५२, ४३५, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, ३२३, ३०७ व १३५ बी.पी. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तापूर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधीचे पार्थिव तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर कावली वसाड येथे अंतिम संस्कार करण्यात आले.