डाॅक्टरने लावला हिटर, गर्भवतीचा पाय भाजला, बोटे कापली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:19+5:302021-04-10T04:13:19+5:30
अमरावती : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर ओल्या बाळंतिनिला थंडी वाजली. डॉक्टरच्या सांगण्यावरून परिचारिकेने महिलेच्या पायाजवळ हिटर लावले. तिचा पाय ...

डाॅक्टरने लावला हिटर, गर्भवतीचा पाय भाजला, बोटे कापली
अमरावती : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर ओल्या बाळंतिनिला थंडी वाजली. डॉक्टरच्या सांगण्यावरून परिचारिकेने महिलेच्या पायाजवळ हिटर लावले. तिचा पाय भाजू लागला. बधिरीकरण आौषधीमुळे तिला वेदना जाणवल्या नाहीत. मात्र पाय भाजला त्यानंतर काही दिवसांनी पायात इन्फेक्शन झाल्याने महिलेच्या पायाची तीन बोटे कापावी लागल्याची दुर्देवी व तेवढीच धक्कादायक घटना शहरात घडली.
तक्रारीनुसार, कॅम्पनजीक असलेल्या भाग्यश्री कॉलनीतील रहिवासी प्रफुल्ल राम देशमुख यांनी या खापर्डे बगिच्या परिसरात असलेल्या काळे नर्सिंग होमच्या संचालक डॉ. संध्या काळे याच्याविरुद्ध सिटी कोतवाली ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदविली. डॉक्टरच्या निष्काळजीपणानामुळे पत्नीच्या पायाची बोटे कापावी लागली, असा आरोप त्यांनी सदर तक्रारीत केला आहे.
प्रफुल्ल देशमुख यांच्या पत्नी भैरवी (३५) या गर्भवती असताना त्यांच्या ओळखीतील डॉक्टर संध्या काळे यांच्याकडे बाळंतपणाकरिता भैरवी यांची नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे उपचार सुद्धा घेणे सुरू केले. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी भैरवी यांना प्रसूतीची कळा सुरू झाल्याने तिला काळे नर्सिंग होममध्ये दाखल केले. भैरवी यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्यांचे ‘सिझेरियन’ झाल्याने बाळंतपणानंतर त्यांना थंडी वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे भैरवी यांना खोलीत आणण्यात आले. मात्र, शस्रक्रिये दरम्यान कमरेखालील भाग ॲनेस्थिशीयामुळे बधिर झाला होता. थंडी वाजत असल्याने डॉक्टरांनी परिचारिकेला हिटर लावण्यास सांगितले. सदर हिटर परिचारिकेने १० मिनिटे भैरवी यांच्या पायाजवळ पकडून त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकण्यात आले. मात्र, पाय बधिर असल्याने तेव्हा हिटरच्या वाफेची त्यांना जाणीव झाली नाही. मात्र काही वेळेत ॲनेस्थिेसियाचा प्रभाव कमी झाल्यानंतर भैरवी यांच्या पायाला वेदना जाणवू लागली. भैरवी यांनी याबाबत परिचारिकेला सांगितल्यानंतर तिने डॉ. काळे यांना कळविले. डॉक्टरांनी बघितले असता, भैरवी यांचा उजवा पाय जळाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने प्लास्टिक सर्जन लक्षक देशमुख यांना पाचारण केले. त्यांनी पायाला ड्रेसिंग करून एक दिवसाआड ड्रेसिंग करण्यास सांगितले. त्यानंतर २४ फेब्रुवारीला डॉ. काळे यांनी भैरवीला डिस्चार्ज केले. त्यानंतर डॉ. देशमुख यांनी महिलेला ड्रेसिंगकरिता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलविले. १ मार्च २०२१ रोजी डॉक्टर लक्षक देशमुख यांनी भैरवी यांच्या उजव्या पायाची तीन बोटे कापावी लागतील, असे त्यांच्या पतीला सांगितले असता, त्यांना धक्का बसला. मात्र, त्यांनी यावेळी कुठलाही निर्णय न घेता डॉ. अर्चना मशानकर यांच्याकडे तपासणीकरिता नेले. त्यांनीदेखील बोेटे कापावी लागतील, असे सुचवित व नागपूर येथील डॉ. शैलेश निसाळ यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. ८ मार्च रोजी डॉ. निसाळ यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनीदेखील बोटे कापवी लागतील असेच सांगितले. त्याच वेळी भैरवी यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटिलमध्ये दाखल करावे लागले. येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरीच उपचार घेऊन ड्रेसिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर अमरावती येथील डॉ. किशोर बेले यांच्याकडे ड्रेसिंग करीत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेच्या पायात पस झाल्याने लवकरच पायाची बोटे कापावी लागतील, असे डॉ. बेले यांनी पतीला सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडे २४ मार्चला भरती करून २५ मार्च रोजी भैरवी यांच्या उजव्या पायाचा अंगठा, करंगळी व करंगळीच्या बाजूचे बोट कापावे लागले. चुकीच्या पद्धतीने व निषकाळजीपणामुळेच पत्नीच्या पायाची बोटे कापावी लागली. याला सर्वस्वी जबाबदार डॉ. संध्या काळे असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार प्रफुल्ल यांनी पोलिसांत नोंदविली. नुकसानभरपाईचीसुद्धा मागणी त्यांनी केली आहे.
बॉक्स:
डॉक्टरचमुळे पत्नीला आले अपंगत्व
पत्नीला उपचार देते वेळी डॉ. काळे यांच्याकडून निष्काळजीपणा झाला. त्यामुळे पत्नीला कायमचे अपंगत्व आले. तसेच गत दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना आजारालाही सामोर जावे लागले. एक महिन्यापर्यंत लहान बाळाला सुद्धा दुध सुद्धा पाजता आले नाही. याला कायमचे अपंगत्व व विद्रुपपणा येण्यास डॉक्टर काळे कारणीभुत असल्याचा आरोप प्रफुल्ल देशमुख यांनी केला. तसेच डॉक्टरविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याकरीता त्यांनी पोलीस आयुक्त व जिल्हाशल्यचिकित्सक यांच्याकडे सुद्धा तक्रारीचे प्रत पाठविली.