तरुणाईला मातृप्रेमाचा विसर का? ‘मदर्स डे’ला निरुत्साह
By Admin | Updated: May 10, 2014 23:54 IST2014-05-10T23:54:28+5:302014-05-10T23:54:28+5:30
विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन्स डे’ प्रचंड उत्साहाने साजरे करणार्या तरूणाईला ‘मदर्स डे’चा मात्र विसर पडतो.

तरुणाईला मातृप्रेमाचा विसर का? ‘मदर्स डे’ला निरुत्साह
‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला मात्र जल्लोष
वर्षा वैजापूरकर - अमरावती
विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन्स डे’ प्रचंड उत्साहाने साजरे करणार्या तरूणाईला ‘मदर्स डे’चा मात्र विसर पडतो. आईच्या प्रेमाची महती केवळ सोशल मीडियापूरतीच मर्र्यादित झाली आहे, असे खेदाने म्हणावे लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मातृदिन रविवारी निरूत्साहातच साजरा होणार आहे. ‘आई म्हणजे एक नाव असतं...घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं..’ आईचे महात्म्य सांगणार्या एक ना अनेक रचना आहेत. आईचे प्रेम म्हणजे ईश्वराचे अस्तित्व.ईश्वराला प्रत्येक घरात जाऊन वास करणे शक्य नव्हते, म्हणून त्याने ‘आई’ निर्माण केली. पुत्र कूपुत्र असू शकतो; पण माता कधीच कूमाता नसते. अफाट, अगाध, अनंत वात्सल्याचा, प्रेमाचा आणि अवर्णनीय त्यागाचा ठेवा हृदयात जपणार्या ‘आई’बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. परदेशात ‘मदर्स डे’, आणि भारतात ‘मातृदिना’च्या निमित्ताने आईचे आभार व्यक्त केले जातात. परंतु नि:स्वार्थ सेवा म्हणजे आई. प्रेमाच्या, त्यागाच्या आणि सेवेच्या मोबदल्यात कधीच, कशाचीही अपेक्षा करीत नाही. परंतु मुलांना मात्र आईच्या या त्यागाची आणि प्रेमाची क्वचितच जाणीव असते. कित्येकदा आईला गृहितच धरले जाते. त्यामुळेच ‘मातृदिन’विशेषत्वाने साजरा करण्यावर भर दिला जात नाही. अनेकांना तर ‘मातृदिना’ची आठवणही राहत नाही. म्हणून तर ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्यासाठी विरोध पत्करणार्या; प्रसंगी जीवाचा आटापिटा करणार्या तरूणाईला ‘मातृदिना’चे विस्मरण होताना दिसते. काही पक्ष व संघटनांकडून ‘व्हॅलेन्टाईन्स डे व फ्रेंडशिप डे’ला कडाडून विरोध होतो. हा दिवस साजरा न करण्याची गळ घातली जाते. प्रसंगी आक्रमक पवित्राही घेतला जातो; परंतु तरीही हा दिवस उत्साहात साजरा करण्याचा अट्टाहास होतो. विरोध झुगारून शहरातील हॉटेल्स, पर्यटनस्थळे, रेस्टॉरेंट्समध्ये व्हॅलेंटाईन्स डे निमित्त भेटवस्तूंचे आदानप्रदान होते.