पाणी पिताय ना? मग काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:27+5:302021-09-09T04:17:27+5:30
संदीप मानकर - अमरावती : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या खूप मोठी आहे. तरीही त्याकडे सर्वत्र दुर्लक्ष केले ...

पाणी पिताय ना? मग काळजी घ्या!
संदीप मानकर - अमरावती : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या खूप मोठी आहे. तरीही त्याकडे सर्वत्र दुर्लक्ष केले जाते. मात्र, आता पाणी पिताय ना? मग काळजी घ्या, अशी म्हणायची वेळ आली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाईप लाईनला लीकेजमुळे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातून अनेक जलजन्य आजार बाळगण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून प्यायलेले बरे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
अमरावती शहराकरिता अप्पर वर्धा धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणातून वषर्भरासाठी शहराकरिता ५४ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले असून वर्षाला अमरावतीकर ४५ दलघमी पाणी घेतात. प्रतिदिन १२० ते १२५ दशलक्ष लिटर पाणी रोज अमरावतीला लागत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती शहरात ९१ हजार ८०० घरगुती नळ कनेक्शनधारक आहेत. ८०० वाणिज्य, तर ६३० शासकीय संस्थेला एमजीपीने नळ कनेक्शन दिले आहेत.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
१) दूषित पाणी पिल्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलोरा, कावीळ, विषमज्वर, पोटाचे विकार, हगवण लागणे, टायफाईड, जंतूची वाढ होणे तसेच इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते, असे मत हृदय व मधुमेहविकार तज्ज्ञ डॉ. मनोज निचत यांनी सांगितले.
बॉक्स:
आजराची लक्षणे
मळमळणे, वारंवार शौचास जाणे, डोळे, लघवी पिवळी होणे, ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, गॅस्ट्रो तसेच शरीरातील पाणी कमी होणे, भूक मंदावणे अशी अनेक प्रकारचे लक्षणे आढळून येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी स्पष्ट केले.
बॉक्स:
पाणी उकळून प्यायलेले बरे
जर आपल्या घरी गढूळ पाणी येत असेल, तर त्यावरून तुरटी फिरविणे, जीवन ड्रॉप टाकणे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक्तेनुसार ब्लिचिंग पावडरचा वापर तसेच पावसाळ्यात सर्वांनी पाणी उकळून ते थंड करून पिणे बरे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
बॉक्स:
अमरावतीकर दररोज पितात १२५ दशलक्ष लीटर पाणी
अमरावती शहराल ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात एकूण ९३, ३९३ नळ कनेक्शनाधारक ग्राहक आहेत. त्यांना प्रतिदिन १२० ते १२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निवृत्ती रक्ताडे यांनी सांगितले.