घाबरु नका, इतरांनाही घाबरुन देऊ नका!
By Admin | Updated: February 14, 2015 23:59 IST2015-02-14T23:59:32+5:302015-02-14T23:59:32+5:30
‘स्वाईन फ्लू’ या जीवघेण्या आजाराने देश, राज्य पातळीवर डोके वर काढले असले तरी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.

घाबरु नका, इतरांनाही घाबरुन देऊ नका!
अमरावती : ‘स्वाईन फ्लू’ या जीवघेण्या आजाराने देश, राज्य पातळीवर डोके वर काढले असले तरी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर स्वाईन फ्लूची दखल घेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ज्या तिघांचा मृत्यू झाला, ते स्वाईन फ्लूनेच दगावल्याचे अधिकृतपणे सिद्ध झाले नाही. त्यामुळे या आजाराबाबत घाबरु नका, इतरांनाही घाबरुन देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्यांची उशिरा सायंकाळी आढावा बैठक पार पडली. ना. पोटे यांनी स्वाईन फ्लूच्या उपाययोजनेबाबत इत्यंभूत माहिती दिली. टॅमी फ्लूच्या २५ हजार ५०० गोळ्यांचा साठा असून कीट्ससुध्दा उपलब्ध आहे. इर्विनमध्ये वॉर्ड नं. ९ हा स्वाईन फ्लूचा स्वतंत्र कक्ष आहे. जिल्ह्यातील ५६ आरोग्य केंद्रात रुग्णांची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे.
स्वाईन फ्लू हा आजार जीवघेणा असला तरी जिल्ह्यात या आजाराचे फारसे पडसाद उमटले नाही. यापूर्वी जे तीन रुग्ण दगावले ते स्वाईन फ्लूमुळे दगावल्याचे स्पष्ट झाले नाही. नवीन तीन रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. स्वाईन फ्लूची लस बाजारात विकत असल्याच्या तक्रारीकडे लक्ष वेधले असता, याबाबत कोणतेही लस उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्पष्ट केले. हा काळाबाजार रोखण्यासाठी पथक गठित करणार, असे ते म्हणाले. वराहांचा हैदोस, कचरा, सांडपाणी याबाबत तातडीचे बैठक घेतली जाणार असे ना. पोटे म्हणाले. पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी किरण गित्ते, तेजुसिंग पवार, निवेदिता चौधरी, अरुण राऊ त आदी उपस्थित होते.