पोलीस ठाण्यात वाजला डीजे, कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST2021-09-23T04:14:57+5:302021-09-23T04:14:57+5:30

तळेगाव दशासर/ अमरावती: कोरोनाच्या अनुषंगाने गणेश विसर्जन अगदी साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना अव्हेरून चक्क पोलिसांनीच पोलीस ठाण्याच्या आवारात डीजेच्या ...

DJ rang at police station, staff's 'Zingat' dance! | पोलीस ठाण्यात वाजला डीजे, कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

पोलीस ठाण्यात वाजला डीजे, कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

तळेगाव दशासर/ अमरावती: कोरोनाच्या अनुषंगाने गणेश विसर्जन अगदी साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना अव्हेरून चक्क पोलिसांनीच पोलीस ठाण्याच्या आवारात डीजेच्या तालावर ‘झिंगाट’ डान्स केला. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १० पर्यंत ते ‘झिंगणे’ सुरू होते.

तळेगाव दशासर पोलीस ठाण्यामधील पोलिसांचा तो 'झिंगाट' डान्स ठाणेदारांना मात्र महागात पडला आहे. बुधवारी सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या ठाणेदार अजय आकरे यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. त्यांचा प्रभार दुय्यम ठाणेदार संदीप बिरांजे यांच्याकडे देण्यात आला. चांदूर रेल्वेचे एसडीपीओ जितेंद्र जाधव यांच्याकडे सदर प्रकरणाचा तपास देण्यात आला असून, त्यांना दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकस्तराहून दिले गेले आहेत. या प्रकरणी आठ पोलीस कर्मचारी रडारवर आले असून पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे.

रविवारपासून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक न काढता, ताशा-बँडचा गजर न करता शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या नियमांनुसार गणेश विसर्जन केले. तळेगाव पोलीस ठाण्याच्या आवारातील गणेशमूर्तीचे मंगळवारी रात्री विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी, पोलीस ठाण्याच्या आवारात डीजे बोलावण्यात आला. बंदी घातलेल्या डीजेचा कर्कश्श आवाज तळेगाव ठाण्यात घुमला.शासन नियम धाब्यावर बसवत डीजेच्या तालावर पोलीस कर्मचारी नाचत असल्याचे दिसून आले. ‘सैराट’मधील ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर त्या पोलिसांनी फेर धरला.

बॉक्स

एसडीपीओ तळेगावात

पोलीस ठाण्यातील या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत नागरिकांकडून आक्षेप नोंदविताच उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव बुधवारी दुपारी १ वाजता तळेगाव दशासर पोलीस ठाण्याला भेट दिली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेत ठाणेदार अजय आकरे यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर, झालेल्या प्रकाराबाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले.

--------------

नियम आम्हीच पाळायचे का?

पोलीस ठाण्यात कर्णकर्कश डीजे वाजल्याबद्दल स्थानिक गणेश मंडळ व गावकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. नियम आमच्यासाठीच आहेत का, या पोलिसांवर कारवाई होणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

///

तळेगाव दशासरच्या ठाणेदाराला नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. डीजेच्या तालावर नेमके कोण पोलीस कर्मचारी नृत्य करीत होते, ते चौकशीदरम्यान स्पष्ट होईल. चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी चौकशी करतील.

- अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण

Web Title: DJ rang at police station, staff's 'Zingat' dance!