निराधार महिलेचे दिवाळीपूर्वी अभ्यंग स्रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 00:26 IST2016-10-23T00:26:33+5:302016-10-23T00:26:33+5:30
दिवाळी सणाचा आनंद अनाथ आणि वंचितांना घेता यावा, म्हणून दोन तरुणांनी पुढाकार घेतला. एका निराधार महिलेला दिवाळीपूर्वी अभ्यंग स्नान घालून

निराधार महिलेचे दिवाळीपूर्वी अभ्यंग स्रान
माणुसकीचे दर्शन : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल
वैभव बाबरेकर अमरावती
दिवाळी सणाचा आनंद अनाथ आणि वंचितांना घेता यावा, म्हणून दोन तरुणांनी पुढाकार घेतला. एका निराधार महिलेला दिवाळीपूर्वी अभ्यंग स्नान घालून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. त्या महिलेला नवे कपडे देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
संपूर्ण बाजारपेठ दिवाळीच्या खरेदीने गजबजली असून दोन तरुणांची नजर एका निराधार महिलेवर स्थिरावली. शुक्रवारी इर्विन चौकातील नर्र्सिंग वसतिगृहासमोर ४० वर्षे वयोगटातील एक महिला त्यांच्या नजरेस पडली. चार दिवसांपासून ती त्याच ठिकाणी अत्यवस्थेत होती. या मार्गावरून रोज शेकडो-हजारो नागरिक ये-जा करतात. लक्ष जावे, अशीच त्या महिलेची विदारक अवस्था होती. मात्र, आपल्याला काय त्याचे, असा भाव व्यक्त करीत अनेकजण पुढील प्रवासाला रवाना होत होते. ती महिला तशीच अत्यवस्थ पडून राहिली. त्यांच्याजवळ माशाही घोंगावत होत्या. तिच्यापर्यंत जाऊन तिची चौकशी करणे, तिला खायला देण्याचे सौजन्य कोणी दाखविले नाही. मात्र, शहरातील गोपाल तुरुक (पाटील) व नितीन अवसरमोल या तरुणांनी तिच्या व्यथा जाणून घेतल्या. या तरुणांची सह्यदयता पाहून त्या महिलेनेही साद दिली. सुनीता सुरेशे अशी नामओळख सांगून आपण अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असल्याचे तिने सांगितले. कुटुंबात कोणीही आपुलकीचे नसल्याने आपली ही अवस्था झाल्याची आपबिती तिने कथन केली. त्यानंतर दोन्ही तरुणांनी तिला पाणी पाजून चहा बिस्कीट खायला दिले.
तरीही द्रवले नाही त्यांचे मन
अमरावती : आपुलकीचे नसल्याने आपली ही अवस्था झाल्याची आपबिती तिने कथन केली. त्यानंतर तिला पाणी पाजून चहा बिस्कीट खायला दिले. तिच्या अंगावरील अस्वच्छ कपडे आणि तिची विदारक अवस्था पाहून गोपाल व नितीन यांनी तिला अभ्यंग स्रान घातले. त्या तरुणांची सह्यदयता पाहून दिवाळीपूर्वीच आपल्याला अभ्यंग स्नान अनुभवता आले, अशी प्रांजळ प्रतिक्रिया त्या महिलेने व्यक्त केली. त्यांनी या महिलेला साडीचोळी केली. मात्र, त्या महिलेला नवीन कपडे घालून कोण देणार, असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे त्यांनी काही महिलांकडे विनवणी केली. मात्र या दोन तरुणांव्यतिरिक्त कुणाचेही मन द्रवले नाही. दरम्यान सुर्यास्त झाल्याने त्या महिलेनेच स्वतच ते नवे वस्त्र परिधान करून तो प्रश्न सोडविला. पुढील मदतीसाठी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. दिगांबर वाघ व संग्राम नाईक या पोलिसांच्या मदतीने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.