‘दिवाळी पहाट’च्या सुरात न्हाले रसिक श्रोते
By Admin | Updated: October 25, 2014 22:33 IST2014-10-25T22:33:37+5:302014-10-25T22:33:37+5:30
‘लोकमत’ सखी मंच, हॉटेल रंगोेली पर्ल आणि नेताजी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’या संगीतमय मैफलीला रसिक श्रोत्यांचा

‘दिवाळी पहाट’च्या सुरात न्हाले रसिक श्रोते
अमरावती : ‘लोकमत’ सखी मंच, हॉटेल रंगोेली पर्ल आणि नेताजी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’या संगीतमय मैफलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रूक्मिणीनगर येथील नेताजी क्रीडा मंडळाचे मैदान रिमझिम पावसाच्या सरींमध्येदेखील रसिकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
‘लोकमत सखी मंच’द्वारे यावेळी शेकडो दिव्यांची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती. या तेजोमय प्रकाशात प्रेक्षकांनी या सुरेल संगीत मैफलीचा आनंद लुटला. कार्यक्रमात गायकांनी भावगीत, सुगम संगीत, भैरवी राग, सुफी, गजल अशा विविध प्रकारातील गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गायक सेबी जेम्स यांच्या सुरेल गळ्यातून उमटलेल्या ‘गगन सदन तेजोमय..’ गीताने या रंगतदार कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर एका पेक्षा एक सरस गीते सादर होऊ लागली. रसिक श्रोत्यांनी या गीतांवर अक्षरश: ताल धरला. अनुजा घाटगे हिने सादर केलेल्या सुफी गाण्याला व गजÞलेला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘होश वालों को खबर क्या...बेखुदी क्या चिज है..’ या सुरेल गजलेने वातावरण भारावून गेले. शास्त्रीय संगीत व भैरवी रागाची जुगलबंदी प्रेक्षकांना मोहवून गेली.
‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आ. सुनील देशमुख, मनपा आयुक्त अरूण डोंगरे सपत्निक उपस्थित होते. तसेच नेताजी मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख, श्रीकांत देशमुख उपस्थित होते. सेबी जेम्स या गायकाने गायिलेल्या ‘लागा चुनरी में दाग..’ या गीताला श्रोत्यांकडून ‘वन्स मोअर’ मिळाला. अनुजा घाटगे हिने कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले. तन्मय चाफले, निधी इंगोले यांनी प्रस्तुत केलेली लावणी उत्कृष्ट ठरली. या लावणीला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी रसिकांनी टाळ्या देऊन निधी इंगळे यांना वन्स मोर म्हणून गायनाला उत्तेजित केले. या लावणीने रसिकांची मने जिंकली. अमरावती येथील गायक भूषण रायबोले यांनी ‘मोरया.. मोरया..’ व ‘राधा ही बावरी’ ही गाणी प्रस्तुत करून वातावरण आल्हाददायक करून टाकले.
की-पॅडवर रामेश्वर काळे, आॅक्टोेपॅडवर राजेश लकडे, तबल्यावर विशाल पांडे, गिटारवर मनीष पाटील यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी लोकमतचे जयंत कौलगीकर, अपूर्व डाखोडे, शीतल चौहान व लोकमतच्या सखींनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाला रुक्मिणीनगर परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सुमधूर गीतांच्या सादरीकरणाने श्रोते भारावून गेले होते.