बोरगाव धांडे येथे दिवाळी!

By Admin | Updated: September 21, 2014 23:43 IST2014-09-21T23:43:05+5:302014-09-21T23:43:05+5:30

आदिवासी समाजाच्या एकत्रिकरणासोबतच अतिशय हलाखीच्या स्थितीत स्वत:च्या कुटुंबाला उच्चशिक्षित करणारे सतीश दीनबाजी उईके जिल्हा परिषदेचे २९ वे अध्यक्ष म्हणून विजयी झाले आणि तालुक्यातील

Diwali at Borgaon Dhande! | बोरगाव धांडे येथे दिवाळी!

बोरगाव धांडे येथे दिवाळी!

मोहन राऊत - अमरावती
आदिवासी समाजाच्या एकत्रिकरणासोबतच अतिशय हलाखीच्या स्थितीत स्वत:च्या कुटुंबाला उच्चशिक्षित करणारे सतीश दीनबाजी उईके जिल्हा परिषदेचे २९ वे अध्यक्ष म्हणून विजयी झाले आणि तालुक्यातील त्यांच्या बोरगाव धांडे गावात त्यांच्या समर्थकांनी रविवारी दिवाळी साजरी केली. बचत गटातील महिलांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावात फटाक्यांची आतषबाजी केली.
सतीश उईके यांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षांपासून आदिवासी समाजाच्या एकत्रिकरणासाठी लढा उभारला. हे काम करीत असताना त्यांनी स्वार्थाचा कधीच विचार केला नाही. तालुक्यातील देवगाव जि.प. सर्कलमधील बोरगाव धांडे हे त्यांचे मूळ गाव. घरी अठराविश्वे दारिद्रय. त्यामुळे विटांच्या भट्टीवर काम करण्याची वेळ बालवयातच त्यांच्यावर आली.
लग्नानंतरही त्यांनी विटांच्या पजाव्यावर काम केले. आर्थिक विपन्नावस्था असूनही त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नेहमीच सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना उच्चशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांनी मोठी मुलगी वैशाली शिक्षक झाली असून लहानी रुपालीसुध्दा धामणगावच्या गोयनका विद्यालयात शिक्षिका आहे. तसेच मुलगा अंकुश एमए पारंगत आहे. लहान मुलगा गौरवचे शिक्षण सुरू आहे.
त्यांचे वडील दीनबाजी उईके सरपंच होते. यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसतर्फे त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यांच्या विजयाची वार्ता गावात पसरताच तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला.
तळागाळातील सच्चा कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेच्या तख्तावर विराजमान होण्याचा सन्मान मिळाल्याने गावकऱ्यांनी गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरा केला. देवगाव सर्कलने पुन्हा आपले राजकीय अस्तित्व या निवडणुकीत दाखवून दिले आहे.

Web Title: Diwali at Borgaon Dhande!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.