दुरवस्थेने ग्रासले
By Admin | Updated: July 7, 2015 00:17 IST2015-07-07T00:17:31+5:302015-07-07T00:17:31+5:30
येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असले तरी नागरिकांना पुरेशा सोयी मिळत नाही.

दुरवस्थेने ग्रासले
चांदूरचे ग्रामीण रुग्णालयसुरेश सवळे ल्ल चांदूरबाजार
येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असले तरी नागरिकांना पुरेशा सोयी मिळत नाही. इतकेच काय तर पाण्याच्या टाकीखाली घाण पाण्याचे डबके साचल्याने येथे काम करणाऱ्यांना तसेच रुग्णांना दूषित पाणी प्यावे लागते. आधीच रिक्त पदाने ग्रासलेल्या ग्रामीण रुग्णालयातील निवाशी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती, नाली बांधकाम व रंगरंगोटीसाठी आ. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याने ५५ लक्ष रुपयांचा निधी बांधकाम विभागाला प्राप्त झाला होता. मात्र, कंत्राटदाराने थातूरमातूर दुरुस्ती करुन कशीबशी रंगरंगोटी करुन दिली तर नालीचे बांधकाम करताना त्यातील पाणी जाण्यासाठी आवश्यक उतार काढला नसल्यामुळे नालीमध्ये घाण पाणी तुडूंब साचले आहे. याचा परिणाम तेथील रहिवासी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. येथे काही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर काही कर्मचारी वेतन येथून घेतात व काम मात्र अमरावती मुख्यालयात करतात. रुग्णालयाला नियमित रुग्णवाहिका नसल्यामुळे अचलपूर रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरावी लागत आहे. येथील नियमित रुग्णवाहिकेच्या चालकाबद्दलही अनेक तक्रारी आहेत.
येथे सहायक अधीक्षकांचे पद रिक्त आहे. औषधी निर्मात्याला सहाय्यक नसल्यामुळे औषध वितरण कधी काळी रखडले जाते. येथे कनिष्ठ लिपिकाचेही पद रिक्त आहे. डॉ. झामरकर यांच्या वैद्यकीय सेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. येथील आर.बी.एस.के.च्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती उपासे या गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर असल्याची बाब आढावा बैठकीत उघडकीस आली.
येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी नसलेले वाटर कुलर आहेत. रुग्णांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही. ग्रामीण रुग्णालयातील परिसरात २३ निवासस्थाने बांधण्यात आली. त्यांच्या डागडुजीसाठी निधी प्राप्त झाला. मात्र रंगरंगोटी करुन थातूर मातूर दुरुस्ती करण्यात आली. निवासस्थानाच्या खिडक्यासुद्धा अद्यापही तुटलेल्या स्थितीत आहेत. तर काही निवास स्थानात भंगार साह्यि भरलेले आहे. त्याचीही दुरुस्ती दाखविण्यात आली. या निवासस्थानात राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना परिसरातील पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरविले जाते. मात्र या टाकीखाली सांडपाण्याचे डबके साचले आहे.
या दूषित पाणी पुरवठ्याची तक्रार वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठांकडे केली. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. परिसरातील पथदिवे सुद्धा बंद असल्याची तक्रार डॉ. अनिल वानखडे यांनी केली.
सदर रुग्णालयाचे रुपांतर ६० खाटांवर करण्यासाठी शासनाची मंजुरात मिळाली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रस्ताव रखडला. ही अडचण दूर करुन नवीन प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले असून त्याला मंजुरात मिळविण्यात येईल. रूग्णालयातील सोयी सुविधा पूर्ववत करुन बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णसेवेतील हयगय सहन केली जाणार नाही.
बच्चू कडू
आमदार
ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयी दूर करुन रिक्त पदे तत्काळ भरण्यात येणार आहेत. सहाय्यक अधीक्षकांचे पद व औषधी निर्मात्याला सहायक देण्यात येणार आहे.
- अरुण राऊत,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.
रुग्णालय परिसरातील बांधकामाची पाहणी करण्यात आली आहे. यातील निकृष्ट बांधकाम व रंगरंगोटीच्या कामाची चौकशी करण्यात येणार आहे. पाण्याच्या टाकीखाली असलेल्या डबक्याची समस्या निकाली काढली जाईल.
- सुनील थोटांगे,
बांधकाम अभियंता.